Lasalgaon : कांदा दरवाढीला ब्रेक ! एकाच दिवसात 1300 रुपयांची घसरण

लासलगाव – कांद्याचे भाव वाढत असताना मात्र कांद्याच्या सरासरी भावात १३०० रुपयांची घसरण झाली. लासलगाव बाजार समिती कांद्याचे लिलाव सुरू होताच मंगळवारच्या तुलनेत मोठी घसरण पहायला मिळाली. मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये साठवलेला उन्हाळ कांदा बाजार समितीमध्ये विक्री येत आहे बदलत्या वातावरणाचा फटका या कांद्याला बसल्यामुळे कांद्याची प्रतवारी खालावली आहे.यामुळे कांदा दर वाढीला आज ब्रेक लागलेला असून शेतकरीवर्गाने कांद्याची प्रतवारी करून कांदा विक्रीस आणला तर त्यांना चांगला भाव मिळू शकेल अशी माहिती लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली

कांद्याला आज जास्तीत जास्त ७ हजार २०२ रुपयांचा भाव तर कमीत कमी १५६०रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. परतीचा पाऊस लांबल्याने कांद्याची प्रतवारी खालवलेली असून शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी बाजार समितीत आणत आहे. मात्र दर घसरल्याने त्यांची निराशा झाली.

नवा कांदा येण्यास अजून २ महिना लागणार असल्याने तो पर्यंत उन्हाळ कांद्यावर विसंबून रहावे लागणार आहे. देशभरात दररोज ५० हजार टन कांदा खाल्ला जातो. त्या तुलनते देशात आवक येत नसल्याने मागणी व पुरवठ्याची ही तफावत येत्या महिन्यात अधिक वाढणार असल्याने कांद्याच्या दरात वाढ होईल अशी शक्यता जाणकार व्यक्त करत आहे.

येथील बाजार समितीच्या मुख्य आवारावर ६७१ वाहनांतुन कांदा ८३०० क्विंटल आवक होऊन कांद्याला कमीत कमी १५६० सरासरी ५८०० तर जास्तीत जास्त ७१०२ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाले.