‘जन्मठेप’ सुनावण्यात आलेल्यांची किती वर्षात होते सुटका, जाणून घ्या कसे ठरते

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : सरकारला किमान 14 वर्षांच्या तुरूंगवासाआधी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एखाद्या गुन्हेगाराला सोडवायचे असेल तर सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांचे घटनापीठ ठरवणार की 14 वर्षांची शिक्षा भोगण्यापूर्वी त्याची तुरूंगातून सुटका करता येईल की नाही.

यापूर्वी सुप्रीम कोर्टाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने या संदर्भातील निर्णय आज शुक्रवारी देण्याचा निर्णय घेतला होता, परंतु या प्रकरणातच अंतिम निर्णय घेण्याऐवजी तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने हे प्रकरण सुनावणीसाठी पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठवले आहे. या प्रकरणात हरियाणा सरकारने 2019 मध्ये स्वातंत्र्य दिनी असे धोरण जाहीर केले होते की, जन्मठेपेची शिक्षा झालेल्या दोषींपैकी जे पुरुष कैदी 75 वर्षापेक्षा जास्त वयाचे आहेत आणि त्यांनी 8 वर्षे तुरूंगात घालवले आहेत तर त्यांना सोडण्यात येईल.

त्याचप्रमाणे ज्या महिला कैद्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे त्यांच्याविषयी अशी घोषणा केली गेली आहे की ज्या महिला कैदी 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आहेत व त्यांनी सहा वर्षे तुरूंगवास भोगला आहे तर त्या महिला कैद्यांना तुरूंगातून सोडण्यात येईल. अशा कैद्यांची शिक्षेदरम्यान तुरूंगात चांगली वागणूक असणे आवश्यक आहे आणि गेल्या दोन वर्षांच्या तुरूंगात अन्य कोणत्याही गंभीर गुन्ह्यात त्यांना शिक्षा मिळालेली नसावी.

कायद्यातील सध्याच्या तरतुदींनुसार शेवटच्या श्वासापर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली जाऊ शकते आणि किमान 14 वर्षांची शिक्षा पूर्ण करणे आवश्यक आहे. तरच सरकार तुरूंगात चांगल्या वागणुकीच्या आधारे कैद्याला सोडण्याचा निर्णय घेऊ शकते.