पुणे जिल्हयातील ग्रामीण भागात लग्न समारंभात 50 पेक्षा जास्त लोक सहभागी झाल्यास होणार कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव पुन्हा वाढला असून, पुणे जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे लग्न समारंभांसंदर्भात नवीन निर्णय घेण्यात आले आहेत. यापुढे लग्न व इतर समारंभात ५० पेक्षा जास्त येणाऱ्या लोकांवर प्रभावी कारवाई करण्याचा आदेश ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख (SP Dr. Abhinav Deshmukh) यांनी काढला आहे. लग्नसराईचा काळ सुरू झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गर्दी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कोरोनाची रुग्णसंख्यादेखील वाढण्याची भीती आहे.

लॉकडाउनमुळे (Lockdown) गेल्या ८ महिन्यांत अनेक समारंभ पुढे ढकलले गेले आहेत. त्यामुळे या पुढील काळात लग्नासह अनेक इतर समारंभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लग्न समारंभ व घरगुती कार्यक्रमात ५० पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये. हॉटेल व्यावसायिक व मंगल कार्यालय व्यावसायिकांनी दिलेल्या सूचनांचे व अटींचे पालन करावे. लग्न व इतर समारंभासाठी येणाऱ्या लोकांची यादी संबंधित व्यावसायिकांनी स्वत:कडे ठेवावी़ सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावेत.

बेकायदा जमाव/ कायद्याचे उल्लंघन करू नये़, अन्यथा आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर योग्य ती दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे या आदेशात सांगण्यात आले आहे. दरम्यान, मागील काही महिन्यांपासून कमी झालेली रुग्णांची संख्या अचानक वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाने कडक भूमिका घेत काही गोष्टींवर बंधने घालायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून या लग्न समारंभांमध्येदेखील गर्दी कमी होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.