Lockdown : ‘राज्य उत्पादन शुल्क’चे कार्यालय फोडले, दारूची चोरी

 पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनामुळे लॉकडाउन करण्यात आल्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद करण्यात आले आहे. त्याचा ताण तळीरामांवर आला आहे. त्यामुळे तलप पुर्ण करण्यासाठी तळीरामांनी राज्य उत्पादन शुल्क कार्यालय फोडून टाळेबंद करून ठेवलेल्या 1 लाख 41 हजार रुपयांच्या देशी-विदेशी दारूची चोरी केली आहे. यासंदर्भात वाई पोलीस ठाण्यात तकृार दाखल झाली आहे.

पाचगणी व महाबळेश्वर परिसरात कारवाईत जप्त केलेल्या देशी-विदेशी दारूचा साठा या कार्यालयात ठेवण्यात आला होता. गुरुवारी मध्यरात्री चोरटयांनी कार्यालयाचा मुख्य दरवाजा तोडून कार्यालयात ठेवलेल्या देशी दारूच्या सुमारे 900 भरलेल्या बाटल्या व 67 हजार 480 रुपयांच्या विदेशी दारूच्या बाटल्या असा 1 लाख 41 हजार 480 रुपयांचा मालाची चोरी केली. मध्यवस्तीत व मुख्य रस्त्यावर हे कार्यालय असताना व परिसरात पोलीस बंदोबस्त असताना चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

दुसर्‍या घटनेत चोरट्यांनी सैदापूर (ता. सातारा) येथील निकी बंट्स बिअर बार फोडून चोरटयांनी दारूच्या बाटल्या, सीसीटीव्ही डीव्हीआर, मोडॅम व रोख रक्कम असा सुमारे 71 हजार 440 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.26 मार्चपासून त्यांचा बार बंद आहे. तेव्हापासून ते 29 मार्च या कालावधीत चोरटयांनी बारचे कुलूप फोडून दारूच्या एक हजार 103 बाटल्या चोरून नेल्या. यासंदर्भात सातारा तालुका पोलिस ठाण्यात तकृार नोंदविली आहे.