‘लॉकडाऊन’मुळं 60 दिवसांपर्यंत बिहारमध्ये अडकलं लग्नाचं वऱ्हाड, ग्रामस्थांनी वर्गणी गोळा करून पाठवली बस

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना लॉकडाऊनमुळे लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातून समोर आली आहे. कानपूरहून बिहारला लग्नासाठी निघालेले वऱ्हाड 60 दिवसानंतर परत आले. लॉकडाऊनमुळे लग्नाचे वऱ्हाड बिहारमध्ये अडकले होते. तथापि, या दरम्यान मुली कडच्यांनी वर्हाडी मंडळींची संपूर्ण काळजी घेतली आणि त्यांना कुठलाही त्रास होऊ दिला नाही.

बिहारच्या बेगूसराय येथील नवरीच्या घरी जवळजवळ 60 दिवस घालवल्यानंतर 11 जणांचे वऱ्हाड वधूबरोबर घरी परतले. हे कुटुंब गुरुवारी चौबेपुरात त्यांच्या घरी परतले, प्रशासनाने त्यांना 14 दिवसांसाठी क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवले आहे. हकीम नगर गावात राहणाऱ्या इम्तियाजचे लग्न 21 मार्च रोजी बिहारमधील बेगूसरायच्या खुशबू सोबत झाले होते. 22 मार्च रोजी जनता कर्फ्यू आणि त्यानंतर देशव्यापी लॉकडाऊनमुळे ‘वऱ्हाड’ परत जाऊ शकले नाही आणि त्यांना नवरीच्या घरीच थांबावे लागले.

नवरदेवाचे वडील मेहबूब म्हणाले की त्यांनी सर्व हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधला, मात्र काही उपयोग झाला नाही. अशा परिस्थितीत आम्हाला वधूच्या घरीच मुक्काम करावा लागला. मुलीच्या कुटुंबावर हे अतिरिक्त ओझे होते आणि आम्ही जेवढे योगदान देऊ शकलो तितके आम्ही केले. दोन दिवसांपूर्वी आम्ही पुन्हा वरिष्ठ जिल्हा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, त्यांनी आम्हाला ट्रॅव्हल पास दिले आणि गावातील लोकांनी वर्गणी गोळा करून मिनी बसची व्यवस्था केली.

मेहबूब म्हणाले की 20 तासांच्या प्रवासादरम्यान, महामार्गावरील लोकांनी वऱ्हाडी मंडळींना अन्न आणि पाणी उपलब्ध करून दिले. ते पुढे म्हणाले की चौबेपुरचे निरीक्षक विनय तिवारी आम्हाला भेटले आणि बिल्हौर सामुदायिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांच्या एका टीमने कोरोना विषाणूची तपासणीसाठी आमचे नमुने घेतले. वऱ्हाडासोबत गेलेल्या लोकांनी सांगितले की आम्हाला याबाबत अजिबात कल्पना नव्हती की या लग्नासाठी जेव्हा आम्ही घराबाहेर पडू तेव्हा आम्ही संकटात सापडू. तथापि, तिथे राहिल्यानंतर वधूच्या कुटुंबीयांनी आम्हाला दिलेले प्रेम आणि आतिथ्य आम्ही कधीही विसरणार नाही. घरी परतल्यावर वऱ्हाडी आनंदी झाले आहेत. त्यांचा असा विश्वास आहे की आम्ही हे लग्न कधीही विसरणार नाही.