Coronavirus Lockdown : ‘ती’ 136 KM चालली, घरापासून तासाभराच्या अंतरावरसोडला ‘जीव’

रायपूर : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे लाखो स्थलांतरीत कामगार आपल्या मुला बाळांसह सध्या आहे त्याच ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यामुळे राहण्याचे आणि खाण्याचे हाल होऊ लागल्याने काहींनी पायीच शेकडो किमी अंतरावरील आपला गाव गाठण्याचे धाडस केले. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अशाच एका घटनेत एका शहरामध्ये अडकून पडलेल्या 12 वर्षीय अल्पवयीन आदिवासी मुलीला आपल्या घराची ओढ लागली होती. त्यासाठी तिने 136 किमीचा पायी प्रवास केला. मात्र, काही अंतरावरच घर आलेलं असताना ती कोसळली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

जमलो मकदम (वय-12) असं तिच नाव असून ती छत्तीसगडमधील बीजापूरची राहणारी आहे. ती ज्या ठिकाणी काम करत होती ते तेलंगणामधील ठिकाण तिच्या गावापासून 150 किमीच्या अंतरावर होते. पहिल्या टप्प्यातील 21 दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये ती तेलंगणामध्येच राहीली. मात्र, पुन्हा 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवल्यानंतर तिचा संयम सुटला. तिने घरी चालत जाण्याचा निर्णय घेतला. ती सतत तीन दिवस चालली होती. तिचे गाव एका तासाच्या अंतरावर होते आणि चालताना अचानक तिला चक्कर आली आणि ती खाली कोसळली. तिचा त्याच जागी मृत्यू झाला. तिच्या पोटात दुखत होते, तरी देखील ती चालत होती असे तिच्या सोबत असणारे सांगतात.

या मुलीने 15 एप्रिल रोजी तिच्यासोबत काम करणाऱ्या 11 मजुरांसोबत घरी जाण्यासाठी चालायला सुरुवात केली. 12 जणांचा हा ग्रुप तीन दिवस पोलिसांच्या भीतीनं रस्ते मार्गाने न जाता जंगलातून मार्ग काढत पुढे निघाला होता. दरम्यान, पीडित मुलगी आपल्या घरापासून केवळ 14 किमी अंतरावर पोहचली असताना शनिवारी दुपारी अचानक तिच्या पोटात वेदना व्हायला लागल्या आणि ती रस्त्यावर कोसळली आणि तिचा मृत्यू झाला.

पीडीत मुलीच्या वडिलांनी सांगितले की, जमालो गेल्या दोन महिन्यापासून तेलंगणातील शेतामध्ये मिरची तोडणीचे काम करत होती. तिला चालताना उलटी झाली होती तसेच तीन दिवस सतत चालत राहिल्याने तिच्या पोटात दुखू लागले. ती पुरेसे जेवणही करत नव्हती, असे तिच्या वडिलांनी म्हटलं आहे.