नितीन गडकरींनी केला काॅंग्रेसबद्दल ‘हा’ मोठा ‘गौप्यस्फोट’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – नागपुरातील एका जाहीर प्रचारभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांविषयी एक मोठं वक्तव्य केलं आहे. गडकरी यांनी काँग्रेस कार्यकर्तेही आपल्याबरोबर असल्याचा दावा केला आहे. तसेच ते भलेही औपचारिकरित्या काँग्रेसचा प्रचार करत असले तरी मानसिकरित्या ते माझ्याबरोबर आहेत. असे विधान त्यांनी केले आहे.

नितीन गडकरी म्हणाले की, ‘काँग्रेसचे कार्यकर्ते मला फोन करत आहेत. ते माझ्या विजयाबाबत निश्चिंत असून ते माझ्याबरोबर आहेत. नागपूर लोकसभा मतदारसंघातून माझ्या विजयाबाबत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही विश्वास आहे. काँग्रेस कार्यकर्ते भलेही माझा प्रचार करत नसले तरी ते मनाने माझ्यासोबत आहेत.’

गडकरी विरुद्ध पटोले सामना रंगणार –

गडकरींच्या या वक्तव्यामागे काँग्रेसमधील गटबाजी कारणीभूत असल्याची चर्चा आहे. अनेक वर्षं काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला नागपूर लोकसभा मतदारसंघ २०१४ मध्ये भाजपकडे आला. नितीन गडकरी यांनी गेल्या वेळी नागपूरमधून जोरदार मताधिक्य मिळवले होते. नितीन गडकरी विरोधात काँग्रेसने नाना पटोले यांना उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी गडकरींविरोधात लढण्यास अनुत्सुकता दाखवली होती.

पटोले आधी काँग्रेसमध्येच होते, नंतर ते भाजपमध्ये गेले आणि गेल्या वर्षी भाजप शेतकऱ्यांच्या प्रश्नांना गांभीर्याने घेत नाही म्हणत त्यांनी पक्षातून तसंच भंडारा-गोंदिया मतदारसंघाच्या खासदारकीचा राजीनामा दिला. देशभरातून मोदी सरकारविरोधात स्पष्ट नाराजी व्यक्त करत राजीनामा देणारे ते पहिले भाजप खासदार ठरले. नागपूरमध्ये गडकरी विरुद्ध पटोले असा सामना रंगणार आहे.