… तर लोकसभा निवडणुकीचा निकाल 1 दिवस उशिरा जाहीर होणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीचा निकाल २३ मे ऐवजी २४ मे राजी जाहीर होऊ शकतो. इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) आणि व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) यांची पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. विरोधकांची ही मागणी मान्य झाल्यास लोकसभा निवडणुकीचा निकाल एक दिवस उशिरा जाहीर होण्याची शक्यता आहे.

ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करुन निकाल जाहीर करण्यात यावा, अशी मागणी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह २१ विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केली आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी दाखल केलेल्या याचिकेत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण करण्यात आले आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यात मतदान झाल्यानंतर २३ मे रोजी मतमोजणी होईल. आतापर्यंत ईव्हीएममध्ये नोंद झालेल्या मतांची मोजणी करुन निकाल जाहीर केला जायचा. यासाठी ४ ते ६ तासांचा अवधी लागायचा. मात्र आता विरोधी पक्षांनी कमीतकमी ५० टक्के ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी केली आहे. यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर १ एप्रिलला सुनावणी होणार आहे.

अधिक व्हीव्हीपॅट यंत्राच्या पडताळणीस कोर्ट अनुकूल –

निवडणुकीत देशातील १० लाख मतदान केंद्रांवर मतदान यंत्रांसोबत, मतदारांना केलेल्या मतदानाची छापील प्रत दाखविणारी ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रेही बसविण्यात येणार आहेत. मात्र मतमोजणीत प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील एकच ‘व्हीव्हीपॅट’ यंत्र निवडून त्यातील मतांची प्रत्यक्ष मताशी पडताळणी करावी, असा आयोगाचा नियम आहे.

काय आहे विरोधकांची मागणी –

मतदान यंत्राद्वारे आपण ज्या उमेदवाराला मत दिले आहे त्यालाच ते मिळाले आहे की नाही, याची खातरजमा या यंत्राद्वारे येणाऱ्या पोचपावतीद्वारे मतदाराला करता येते. लोकसभा निवडणुकांमध्ये, प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांपैकी किमान ५० टक्के यंत्रांमधील व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्यासह २१ विरोधी नेत्यांनी केली आहे.