किरीट सोमय्यांचा पत्ता कट, ‘या’ नेत्याला उमेदवारी मिळण्याची शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेनेकडून मुंबईतून सर्व उमेदवारांची घोषणा झाली आहे. परंतु, भाजपाच्या ईशान्य मुंबई या जागेचा पेच अजूनही कायम असल्याचे दिसत आहे. विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना शिवसेनेकडून कडाडून विरोध केला आहे. त्यामुळे या जागेसाठी भाजप श्रेष्ठी मनोज कोटक यांच्या नावाचा विचार करत असल्याचं समजत आहे.

२०१४च्या विधानसभा निवडणूकीत युती तुटल्यानंतर किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला होता. इतकेच नाही तर, महापालिकेच्या कारभारावर टीका करताना सोमय्या यांनी मातोश्रीला टीकेच्या फेऱ्यात घेतलं होतं. त्यामुळे किरीट सोमय्या यांच्याबद्दल शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे सोमय्या यांना जर तिकीट दिले तर शिवसैनिक काम करणार नाहीत असा इशाराच त्यांनी दिला आहे.

ईशान्य मुंबईच्या जागेचा पेच सोडवण्यासाठी मंगळवारी वर्षा आणि मातोश्रीवरही बैठका झाल्या. या बैठकीत चर्चाही करण्यात आली. यावर तोडगा म्हणून महापालिकेतील भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांचं नाव पुढे आले आहे. त्यामुळेच ईशान्य मुंबईतून कोटक यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबईतल्या एकूण ६ लोकसभा मतदारसंघांपैकी युतीच्या गणितानुसार ३ जागा भाजपकडे तर ३ शिवसेनेकडे येतात. भाजपच्या कोट्यातल्या ३ पैकी २ जागांवरचे उमेदवार पहिल्याच यादीत जाहीर करण्यात आले होते. त्यापैकी मुंबई उत्तरमधून गोपाळ शेट्टी आणि उत्तर मध्य मुंबईमधून पूनम महाजन या विद्यमान खासदारांनाच उमेदवारी देण्यात आली आहे.

ईशान्य मुंबईतले खासदार किरीट सोमय्या यांची उमेदवारी मात्र अद्याप जाहीर झालेली नव्हती. महाराष्ट्रातून उमेदवारी जाहीर झाली ते बहुतेक सगळे विद्यमान खासदारच आहेत.