राज ठाकरेंवर पातळी सोडून टीका करणाऱ्याला मनसे स्टाईलने चोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपविरुद्ध मोहिम उघडली आहे. राज यांनी आपल्या भाषणामधून भाजपच्या धोरणांना विरोध करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे राज ठाकरे सध्या भाजपच्या आयटी सेलच्या निशान्यावर आहेत. त्यानंतर सोशल मीडियातून कोणीही माझ्यावर पातळी सोडून टीका केल्यास त्याला धडा शिवकवण्याचे आदेश मनसे कार्यकर्त्यांना ठाकरे यांनी दिले आहेत. त्यातच पातळी सोडून टीका करणाऱ्यांना त्यांच्या घरी जाऊन चोप देतानाचा मनसे कार्यकर्त्यांचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मनसेचे कार्यकर्ते एका घरासमोर उभे राहून राज ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्याला माफी मागायला भाग पाडत आहत. तसेच यापुढे राज ठाकरे यांच्याविरुद्ध खालच्या भाषेत टीका न करण्याची कबूली घेत असतानाचे दिसत आहेत.

राज ठाकरे यांनी एका सभेत ट्रोलर्सला भीक घालत नसल्याचे म्हटले होते. तसेच भाजपचे आयटी सेलचे कार्यकर्ते आणि भक्त लावारीस असल्याची टीका करताना पातळी सोडून टीका करणाऱ्यांना धडा शिकवण्याचे आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले होते. त्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले असून ते टीका करणाऱ्यांना धडा शिकवण्याच्या कामाला लागल्याचे पहायला मिळत आहे.