सुशीलकुमार शिंदेंच्या ‘दगडू’ नावामुळे उमेदवारी अर्जावर आक्षेप

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार प्रमोद गायकवाड यांनी भाजपचे डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी आणि काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला होता. मात्र, या दोघांच्या प्रतिनिधींनी सक्षम कागदपत्र सादर केल्याने हा आक्षेप फेटाळून लावण्यात आला आहे.

सुशीलकुमार शिंदे यांच्या जन्म दाखल्यावर दगडू संभू शिंदे असे नाव नमूद करण्यात आले आहे. तर त्यांनी गॅझेटमध्ये बदल करून सुशीलकुमार संभाजी शिंदे असे नाव करून घेतले आहे. तसेच सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या उमेदवारी अर्जात वयाची नोंद चुकीची केली आहे, असा आक्षेप प्रमोद गायकवाड यांनी घेतला होता. प्रमोद गायकवाड यांनी घेतलेल्या हरकतीवर सुशीलकुमार शिंदे यांनी नाव बदलाचा गॅझेटचा कागदोपत्री पुरावा सादर केला. या पुराव्याच्या प्रस्तुतीने ही हरकत फेटाळण्यात आली. तर वयाबाबत शिंदे यांची वयाची २५ वर्ष पूर्ण आहेत. त्यामुळे त्यांचे वय लिहताना चुकले असले तरी तो अर्ज फेटाळण्याचा मुद्दा होऊ शकत नाही असे म्हणत गायकवाड यांचा आक्षेप निवडणूक अधिकाऱ्याने फेटाळून लावला.

डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या जातीच्या दाखल्यावर देखील प्रमोद गायकवाड यांनी आक्षेप घेतला आहे. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी हे मूळचे हिंदू लिंगायत समाजाचे असल्याने त्यांनी सादर केलेला जातीचा दाखला हा बनावट असल्याचे प्रमोद गायकवाड यांनी म्हणले होते. नुरवंद गुरूबसय्या हिरेमठ असे महास्वामींचे मूळ नाव आहे. त्यामुळे त्यांचा अर्ज फेटाळून लावावा असे गायकवाड म्हणाले होते. गायकवाड यांचा हा आक्षेप देखील निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळून लावला आहे.