मोदीजी, धोकेबाजांना देश माफ करणार नाही : प्रियंका गांधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी पंतप्रधान राजीव गांधींबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या टीकेला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनंतर आता प्रियंका गांधी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मोदीजी, धोकेबाजांना हा देश कधीही माफ करणार नाही असं ट्विट प्रियंका गांधी यांनी केलं आहे.

मोदींनी काल प्रतापगड आणि बस्ती येथील जाहीर सभांमध्ये राहुल यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर टीका केली होती. तुमचे वडील राजीव गांधी मिस्टर क्लिन म्हणून ओळखले जात होते. परंतु मिस्टर क्लिनचा कार्यकाळ हा भ्रष्टाचारी नंबर १ म्हणून संपला. त्याला प्रत्युत्तर देत प्रियंका गांधींनी मोदींवर पलटवार केला आहे. प्रियंका गांधी यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की , ‘ शहिदांच्या नावे मतं मागून शहिदांचा अपमान करणाऱ्या पंतप्रधानांनी आपल्या बेलगाम वक्तव्याने सभ्य, निष्कलंक व्यक्तिमत्वाचा अनादर केला. अमेठीची जनता याच उत्तर देईल ज्यांच्यासाठी राजीवजींनी हौतात्म्य पत्करलं. मोदीजी, धोकेबाजांना हा देश कधीही माफ करणार नाही.’

तसेच मोदींना राहुल गांधी म्हणाले होते की , ‘मोदी जी, लढाई संपलेली आहे. तुमचं कर्म तुमची वाट पाहतेय. तुमची वैयक्तिक मते माझ्या वडिलांवर लादल्याने तुमची सुटका होणार नाही.’

काय म्हणाले होते मोदी –

‘तुमच्या वडिलांची प्रतिमा तुमच्या ‘राजदरबाऱ्यांनी’ मिस्टर क्लीन अशी रंगवली होती. पण त्यांच्या आयुष्याची अखेर ‘भ्रष्टाचारी नंबर १’ च्या रुपात झाली. नामदार, हा अहंकार तुम्हाला खाऊन टाकेल. हा देश चुका माफ करतो, पण फसवेगिरी कधीही माफ करत नाही. १९८० मध्ये राजीव गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात काळात बोफर्स घोटाळा झाला. त्यानंतर काँग्रेसला सत्तेत येणं देखील कठिण झालं होतं. देशाच्या विकासात व्यक्ती म्हणून गांधी घराणं कोणतंही योगदान देत नसल्याचही मोदी म्हणाले होते.