‘ईव्हीएम’ मध्ये दडलंय काय, सांगता येत नाही ! : प्रकाश आंबेडकर

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान गुरुवारी पार पडले. राज्यातील दहा लोकसभा मतदारसंघामध्ये काल मतदान झाले. मतदान झालेल्या दहा मतदारसंघापैकी सोलापूर लोकसभा मतदारसंघात ‘ईव्हीएम’ मध्ये बटण कोणतेही दाबल्यानंतर मतदान भाजपला जात असल्याच्या तक्रारी मतदारांनी केल्या होत्या. यानंतर चार ईव्हिएम मशीन सील करण्यात आल्या. अकोल्यात मी मतदान केले , पण ईव्हीएममध्ये दडलंय काय, हे सांगता येत नाही. कारण कागदावरील चिन्ह पुसले जाऊ शकते, अशी शंका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख तथा अकोला लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केली आहे.

पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांवर उत्तरे देताना आंबेडकर म्हणाले, सोलापूरमध्ये चार मशीन सील करण्यात आल्या आहेत. त्याचा अहवाल बाहेर आल्यावर खरे काय ते कळेल, असे सांगताना त्यांनी अकोल्यातही मतदान केल्यानंतर मला माझे छायाचित्र व निशाणी दिसली, मात्र पेट्रोल पंपावर जी पावती मिळते, त्या पावतीवरील अक्षरे काही वेळात पुसली जातात. म्हणूनच ईव्हीएम, व्हीव्हीपॅटच्या निशाणी व अक्षरांच्या बाबतीत त्यांनी शंका व्यक्त केली.

प्रज्ञा सिंग यांच्या उमेदवारीवर बोलताना आंबेडकर म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही आतंकवादी संघटना असून, प्रज्ञ सिंग यांच्यावर गुन्हे आहेत. असे असताना उमेदवारी दिली. कारण संघ दहशतवादी संघटना आहे, हे सर्व जगाला माहीत आहे. संघाकडे असणारी शस्त्रे हेच अधोरेखित करते. संघाला लोकशाही नकोय म्हणून जेथे संधी मिळेल तेथे संघ दहशतवादी कारवाया करते. कोणताही धर्म दहशतवादी नसतो. मात्र, आपल्या कारवायांवर पांघरुण घालण्यासाठी संघ हिंदू नाव पुढे करतो, असा आरोप त्यांनी केला.