मोदी, राहुल, पवार नाही तर आंबेडकरांच्या मते ‘हे’ माजी पंतप्रधान होऊ शकतात पुन्हा पंतप्रधान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकांनंतर आता वेध लागले आहेत ते पंतप्रधानपदी कोणाची वर्णी लागणार याचे. अनेक नेत्यांकडून पंतप्रधानपदाचे दावेदार कोण आहेत याची भाकितं वर्तवली जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू आणि मायावती या तिघांची नावं पंतप्रधान पदासाठी दावेदार असू शकतात असे म्हंटले होते. यावरून राजकीय क्षेत्रात मोठा गोंधळ उडाला होता. मात्र आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देखील पंतप्रधान पदाचे देवदार कोण असतील याचे भाकित वर्तवले आहे.

याबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले, ‘देशाचा आगामी पंतप्रधान हा काँग्रेस किंवा भाजपचा नसेल. त्यामुळे राहुल गांधी किंवा नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याची शक्यता नाही. निवडणुकीनंतर माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा हे पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार ठरू शकतात,’ असा अंदाज प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे.

पवार पंतप्रधानपदाच्या लायक नाहीत

अनेकांकडून पंतप्रधान पदाकरिता राष्ट्रवादीर्चे अध्यक्ष शरद पवार योग्य असल्याच्या चर्चा राजकिय वर्तुळात चालूं आहेत. सोशल मीडियावर देखील याबाबत प्रतिक्रिया उमटत आहेत असे असताना ‘शरद पवारांना मी पंतप्रधानपदाच्या लायक मानत नाही. ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू आणि केसीआर हे देखील कधीच पंतप्रधान होणार नाहीत,’ असं विधान आंबेडकरांनी केलं आहे. त्यांचे हे वक्तव्य सध्या चर्चेचा विषय बनले आहे. यंदाच्या निकालात भाजपला १४८ ते २०० जागा मिळतील असा अंदाज आंबेडकरांनी व्यक्त केला. तर काँग्रेसला १०० पर्यंत जागा मिळतील असे आंबेडकर म्हणाले.

नक्की काय म्हणाले शरद पवार

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) स्पष्ट बहुमत मिळवण्यात अपयशी ठरल्यास पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मु्ख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती हे मुख्यमंत्रीपदाचा अनुभव असलेले पंतप्रधानपदासाठी प्रबळ दावेदार असतील असा दावा एका वृत्तवाहिनीशी बोलताना पवार यांनी केला.

पंतप्रधान पदाविषयी बोलताना शरद पवार म्हणाले की, ‘ नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याआधी गुजरातचे मुख्यमत्री होते. त्यांनी राज्याच्या राजकारणात केलेली कामगिरी पाहूनच त्यांच्या नेतृत्वाखालील NDA ला २०१४ मध्ये लोकांनी बहुमत दिले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीएला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळणे अतिशय कठीण आहे. त्यामुळे NDA बहुमत मिळवण्यास अपयशी ठरले, तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मु्ख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती हे मला पंतप्रधानपदासाठी योग्य पर्याय दिसतात. असे पवार म्हणाले होते.