तुम्ही ओवेसी असाल तर, मी ठाकरे आहे ठाकरे : आदित्य ठाकरेंचा इशारा

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – जातीपातीचे राजकारण करून शहराचे वातावरण खराब करू नका. शिवसेनेने कधीही जातपात बघून राजकारण केले नाही. तुम्ही ओवेसी असाल, मी ठाकरे आहे. असा इशारा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. येत्या २३ एप्रिलला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. याचदरम्यान औरंगाबाद लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते . त्यावेळी शिवसेनेने कधीही जातीपातीचे हीन राजकारण केले नाही, पण सध्या शहरात जातीपातीच्या नावावर विष कालवण्याचे काम होत आहे. चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात तीन आमदार उभे आहेत. एमआयएमचे जलील कधी आले होते का तुमची विचारपूस करण्यासाठी? नशिबाने विधानसभेत गेले, आता दिल्लीत जाण्याचे स्वप्न पाहत आहेत. त्यांचे नेते ओवेसी आले आहेत. त्यांना एकच सांगतो. आम्ही सगळ्य़ा धर्मांचा आदर करतो. विस्तवाशी खेळण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही ओवेसी असाल, माझ्या धमन्यांमध्येही बाळासाहेबांचे रक्त आहे. वातावरणात विष कालवू नका. शिवसेनाप्रमुखांचे या शहरावर खास प्रेम होते हे लक्षात ठेवा. असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.

याचबरोबर युतीचे खासदार, आमदार चांगले काम करीत आहेत. केंद्र आणि राज्यात युतीचेच सरकार आहे. मी औरंगाबादला नियमित येत असतो. कामाचा आढावाही घेतो. रस्ते, एसटीपी प्लॅण्ट, स्मार्टसिटीतून सिटीबस सेवा सुरू करण्यात आली. असेही त्यांनी म्हंटले. तसेच शिवसेनेला या शहरासाठी आणखी भरपूर काही करायचे आहे. चांगली कामे केल्यामुळेच देशभरातून कामासाठी स्थलांतरीत नागरिक झालेले राहायला येतात यावरूनच विकासकामे झाल्यामुळे हे नागरिक आनंदाने राहतात, असेही त्यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, शहरात अतिक्रमणांच्या नावाखाली मंदिरे पाडण्यात आली. त्यावेळी जीवाची पर्वा न करता चंद्रकांत खैरे यांनी मंदिरे वाचवण्याचे काम केले. या भागातील हिंदूंची मंदिरे वाचवलीत. मंदिरांचे रक्षण करणे हे आमचे कर्तव्यच आहे. असेही त्यांनी म्हंटले. याचबरोबर यापुढेही आम्ही हे काम करत राहू. सत्ता असो वा नसो, शिवसेना भक्कमपणे हिंदूच्या पाठीशी असेल. असेही त्यांनी म्हंटले.