काँग्रेसच्या 51 उमेदवारांच्या यादीत नाव नसल्याने सातार्‍यात उदयनराजे भोसले Vs पृथ्वीराज चव्हाण यांचा ‘सामना’ निश्‍चीत !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या तीन महिन्यात खासदारकीचा राजीनामा देऊन उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. उदयनराजे यांच्या राजीनाम्यामुळे रीक्त झालेल्या जागेसाठी विधानसभा निवडणुकीबरोबरच लोकसभेची पोटनिवडणूक होणार आहे. उदयनराजे भोसले यांच्या विरोधात पृथ्वीराज चव्हाण हे निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. मात्र, आज काँग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्या उमेवारांच्या यादीमध्ये चव्हाण यांचे नाव नसल्याने सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे.

विकास कामे होत नसल्याचा आरोप करून उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत खासदारकीचा राजीनामा दिला. राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करताना त्यांनी विधानसभा निवडणुकीबरोबर लोकसभेची पोटनिवडणूक घेण्याची अट घातली होती. सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभेबरोबर घेण्याची घोषणा निवडणूक आयोगाने केल्यानंतर उदयनराजे यांच्या विरोधात कोणाला उभे करायचे याची चाचपणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरु होती. यामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव आघाडीवर होते.

आज काँग्रेसने आज 51 उमेदवारांची यादी जाहीर केला आहे. यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव या यादीमध्ये नसल्याने ते सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लढवणार असल्याचे निश्चित झाले आहे. दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसभेची पोटनिवडणूक लढवण्यास आपण इच्छूक नसल्याचे सांगितले होते. तर पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसभा न लढवता त्यांनी विधानसभा निवडणूक लढवावी असा आग्रह कार्य़कर्त्यांनी धरला आहे. मात्र, पक्ष श्रेष्ठींच्या आदेशावरून आज विधानसभेच्या 51 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यात त्यांचे नाव नाही. त्यामुळे लोकसभा पोटनिवडणूक उदयनराजे भोसले विरुद्ध पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये होणार हे जवळपास निश्चित झाले असून यामध्ये कोण बाजी मारतो हे निकालानंतर समजेल.

Visit : Policenama.com