राज ठाकरेंचे भाषण म्हणजे मतदारांची निव्वळ करमणूक ; भाजपच्या ‘या’ खासदाराची टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे भाषण म्हणजे मतदारांची निव्वळ करमणूक अशी खरमरीत टीका भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि भाजपचे उत्‍तर मुंबई लोकसभा मतदार संघातील उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी केली आहे. राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्‍त शनिवारी आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर शरसंधाण साधले होते.

त्यावर खा. गोपाळ शेट्टी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. केवळ प्रसारमाध्यमांमध्ये टिकून राहण्यासाठी राज ठाकरे यांना अशा प्रकारची भाषणे करावी लागतात असेही खा. शेट्टी यावेळी म्हणाले. राज ठाकरेंना प्रसारमाध्यमांमध्ये रहावयाचे असेल तर त्यांना मोदींवर टीका करावीच लागणार आहे, मोदींवर जर बोलले नाही तर मीडिया त्यांच्याकडे जाणारच नाही. मला त्यांची किव येते, ज्या काँग्रेसने त्यांना सोबत घेण्यास स्पष्ट नकार दिला, त्यांच्यासाठीच आज राज ठाकरेंना मैदानात उतरावे लागत असल्याची देखील टीका खा. गोपाळ शेट्टी यांनी केली.

लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांना पाडा असे राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे. पण, मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांना ते पटलेले नाही. काही नाराज मनसैनिक आम्हाला भेटत असून ते भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक असल्याचा दावा देखील खा. शेट्टींनी केला आहे. अलिकडील काळात मतदार हुशार आणि परिपक्‍क झालेले आहेत. भाषण ऐकुन मतदार आपले मत बनवत नाहीत.

त्यांना मताचे महत्व समजले आहे. लोक केवळ करमणुकीसाठी भाषण ऐकायला जातात, जे लोक भाषण ऐकायला येतात ते आपल्यालाच मतदान करतील असे कोणीही गृहित धरू नये असे शेट्टी यांनी राज ठाकरेंना उद्देतुन म्हटले आहे. उत्‍तर मुंबईमधुन काँग्रेसकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर निवडणुक लढवित आहेत. त्यांची उमेदवारी जाहिर झाल्यानंतर मनसेच्या शर्मिला ठाकरे यांनी उर्मिलाला शुभेच्छा दिल्या होत्या. तेव्हापासुन मनसे आणि मनसेचे कार्यकर्ते उर्मिला मातोंडकर यांना मदत करणार हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच खा. शेट्टी मनसेवर टीका करीत असल्याची चर्चा आहे.