मनमोहन सिंग पंजाबमधून लोकसभा लढवणार ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभेची निवडणूक काल रविवारी निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आली. त्यानंतर आज राजकीय घडामोडीला वेग आला आहे. निवडणुकीच्या अशा लगीन घाईमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे अमृतसरमधून निवडणूक लढणार आहेत असे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेसमधील विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मनमोहन सिंग हे स्वतः निवडणूक लढण्यास इच्छुक नाहीत. मात्र पक्षातून त्यांना निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आग्रह होत आहे.

शिखांचे पवित्र धार्मिक स्थळ असणाऱ्या अमृतसरमधून मनमोहन सिंग यांनी निवडणूक लढल्यास आम्हाला आनंद होईल असे पंजाब प्रदेश काँग्रेसने म्हणले आहे. ८६ वर्षीय मनमोहन सिंग यांनी निवडणूक लढण्यास अद्याप इच्छुक नाहीत. या आधीही मनमोहन सिंग यांना अमृतसर मधून निवडणूक लढण्याची विनंती करण्यात आली होती. २००९ साली त्यांना या ठिकाणी निवडणूक लढण्यासाठी आग्रह करण्यात आला होता. मात्र त्यांनी त्यावेळी प्रकृतीचे कारण देत निवडणूक लढण्यास नकार दिला होता.

मनमोहन सिंग यांनी भारतीय रिजर्व बँकेचे गव्हर्नर पद भूषवले आहे. त्या पदावरून निवृत्त झाल्यावर मनमोहन सिंग यांनी राजकारणात प्रवेश केला. मनमोहन सिंग हे सर्वप्रथम १९९१ साली आसाममधून राज्यसभेची निवडणूक लढली. त्यानंतर आजतागायत त्यांनी लोकसभेची निवडणूक जिंकली नाही. १९९९ साली त्यांनी दक्षिण दिल्लीतून काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढवली होती मात्र भाजपच्या व्ही के मल्होत्रा यांनी मनमोहन सिंग यांना पराभूत केले होते.