लोकसभेच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला शांततेत सुरुवात

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – लोकशाहीच्या महापर्वातील पहिल्या अध्यायाला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. विदर्भातील ७ लोकसभा मतदारसंघासह देशातील ९१ मतदार संघात मतदानाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणच्या मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागलेल्या दिसून येत आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत हे आज सकाळीच मतदान केंद्रावर हजर झाले. त्यांनी सर्वप्रथम मतदान केले. त्यानंतर हातावरील निशाणी दाखवत यांनी मतदान करण्याचे आवाहन केले.

यवतमाळ येथील दाते कॉलेज मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन सुरु होण्यास तांत्रिक कारणाने उशीर झाल्याने मतदान पाऊण तास उशिरा सुरु झाले.

रामटेकमधून शिवसेनेचे विद्यमान खासदार व उमेदवार कृपाल तुमाने यांनी सकाळीच मतदान केले. आनंदवनातील कुष्ठरोगींनीही मतदानाचा हक्क बजावला आहे.

गोंदियातील रामनगर मतदान केंद्रावर मतदान सुरु होण्याआधी व्हीव्हीपॅट मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदान खोळंबले. यवतमाळ येथील अनेक ठिकाणी १० ते १५ मिनिटे उशिराने मतदान सुरु़ झाले. येथील दादासाहेब मांडळे विद्यालयात मतदारांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.