इंद्रायणीत अतिक्रमण केल्यानं लोणावळा नगरपरिषदेला राष्ट्रीय हरित लवादाचा दणका, एकाच प्रकरणात दुसऱ्यांदा दंड !

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाईन – नगरपरिषदेची परवानगी घेऊन खासगी व्यक्तीनं बंगला बांधताना इंद्रायणी नदीचा नैसर्गिक प्रवाह बदलला. तसेच नदी पात्रात भराव टाकून अतिक्रमण केल्याप्रकरणी राष्ट्रीय हरित लवादानं (नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल – एनजीटी) लोणावळा नगरपरिषदेला दणका देत दंड ठोठावला आहे. या प्रकरणी अहवाल देण्यास दिरंगाई केल्यानं यापूर्वीच एनजीटीनं नगरपरिषदेला दंड ठोठावला होता. त्यामुळं एकाच प्रकरणात नगरपरिषदेवर दुसऱ्यांदा दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

भूशी येथील सर्व्हे नं. 24 मध्ये प्रकाश मिसरीलाल पोरवाल नावाच्या व्यक्तीचे 22 गुंठ्याचे क्षेत्र आहे. त्यावर त्यांनी नगरपरिषदेची परवानगी घेऊन बंगला बांधला आहे. हा बंगला बांधताना पोरवाल यांनी इंद्रायणी नदीचा नैसर्गिक प्रवाह बदलला, तसेच नदी पात्रात भराव टाकून आणखी साडे आठ गुंठे क्षेत्र त्याब्यात घेऊन त्यावर अतिक्रमण केले, अशी तक्रार अर्जदार व माहिती अधिकार कार्यकर्ते पुजारी यांनी हरित लवादाकडे केली होती. याची गंभीर दखल घेतल हरित लवादानं नगरपरिषद मावळ तहसिलदार, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अशा चार संस्थांची चौकशी समिती नेमून अहवाल मागविले होते.

हा अहवाल देण्यास समन्वय अधिकारी पवार यांनी दिरंगाई केल्याने 1 मे 2019 रोजी लवादाने त्यांना 5 लाखाचा दंड ठोठावला. हा दंड नगरपरिषदेने भरला देखील होता. त्यानंतरही चौकशी समितीने या प्रकरणी तातडीने पावले न उचलल्याने हरित लवादानेग गेल्या वर्षी सप्टेंबर मध्ये समितीतील सर्वांवर 15 लाखाच्या दंडाची कारवाई केली होती. त्यात नगरपरिषदेसोबतच चौकशीमधील मावळ तहसिलदार, पाटबंधारे कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचाही समावेश होता.