नरेंद्र मोदीच आमच्यासाठी ‘सुप्रीम’ कोर्ट : संजय राऊत

लखनऊ : शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत म्हणाले की, देशाच्या जनतेने नरेंद्र मोदी यांना पूर्ण बहुमत दिले आहे. आमच्यासाठी नरेंद्र मोदीच सुप्रीम कोर्ट आहेत. राऊत म्हणाले की, अयोध्येत राम मंदिर निर्माण होण्याचा शुभ मुहूर्त आला आहे. केंद्रात आणि उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार आहे, आता मंदिराची निर्मिती करण्यासाठी उशीर नाही झाला पाहिजे. संजय राऊत यांनी लखनऊमध्ये माध्यमांशी बोलताना हे मत मांडले.

त्यांनी म्हंटले की, राम मंदिर होणारच आहे. प्रत्येक वेळी राम मंदिराच्या नावावर जनतेकडून मते मागणे योग्य नाही.

संजय राऊत यांनी सांगितले की, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे १६ जूनला शिवसेनेच्या सर्व खासदारांसोबत अयोध्येत येऊन राम मंदिराचे दर्शन घेणार आहेत. त्यांनी असेही म्हंटले की, एनडीएमध्ये भाजपनंतर सर्वात मोठा पक्ष शिवसेना आहे यामुळे लोकसभेच्या उपसभापती पदावर हक्क सांगणे हा आमचा अधिकार आहे.

शिवसेनेचे अयोध्येसोबत जुने नाते
संजय राऊत म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत एनडीएला मोठे यश मिळाले आहे. रामलल्ला यांच्या आशीर्वादानेच हे शक्य झाले आहे. आता, उद्धव ठाकरे या आशीर्वादाची परतफेड करण्यासाठी सर्व नवनिर्वाचित खासदारांसोबत रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी येथे येत आहेत. शिवसेनेचे अयोध्येशी जुने नाते आहे आणि शिवसेनेची रामलल्ला वर श्रद्धा आहे.