M-Cap : TCS 9 लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल असलेली दुसरी भारतीय कंपनी बनली, कंपनीच्या शेअर्समध्ये 5% वाढ

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) नऊ लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल साध्य करणारी दुसरी भारतीय कंपनी बनली आहे. यापूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने बाजार मूल्यांकनाच्या बाबतीत हा आकडा गाठला होता. बीएसई वर सॉफ्टवेअर सर्व्हिसेस कंपनीच्या शेअर्सची किंमत 5 टक्क्यांनी वाढून 2,492.30 रुपये झाली. दिवसाच्या व्यापारात कंपनीचे समभाग एकाच वेळी 5.49 टक्क्यांनी वधारून 2,504.20 रुपयांवर पोहोचले होते.

एनएसई वर कंपनीचा शेअर भाव 4.84 टक्क्यांनी वाढून 2,489.20 वर गेला. कंपनीच्या शेअर्समधील या वाढीमुळे कंपनीचे बाजार भांडवल 44,503.84 कोटी रुपयांनी वाढले आणि बीएसईतील व्यापार सत्र संपल्यानंतर कंपनीचे बाजार मूल्यांकन 9,35,206.84 कोटी रुपयांवर पोहचले.

टीसीएस ही बाजारातील भांडवलाच्या बाबतीत देशातील दुसरी सर्वात मूल्यवान कंपनी आहे. टीसीएसच्या बाजार भांडवलात यावर्षी आतापर्यंत 15.31 टक्के वाढ नोंदली गेली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) अजूनही मार्केट कॅपच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वात रिलायन्स इंडस्ट्रीज गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये 9 लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल गाठणारी पहिली कंपनी ठरली होती. कंपनीचे बाजार भांडवल सध्या 15,56,857.73 कोटी रुपयांवर आहे.