अखेर माढयाचा तिढा सुटला : भाजपकडून रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी

नवी दिल्‍ली : पोलीसनामा ऑनलाइन- माढा लोकसभा मतदार संघाचा तिढा आता सुटला आहे. भाजपने नुकताच पक्षप्रवेश केलेल्या रणजितसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांना माढा लोकसभा मतदार संघातुन उमेदवारी जाहिर केली आहे. त्यामुळे आता माढयात राष्ट्रवादीचे संजयमामा शिंदे आणि भाजपचे रणजितसिंह निंबाळकर यांच्यात सामना रंगणार आहे.

माढा लोकसभा मतदार संघ गेल्या दोन महिन्यांपासुन चर्चेत आहे. सर्वप्रथम राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदार संघातुन निवडणुक लढणार असे जाहिर केले होते. त्यानंतर शरद पवार यांनी निवडणुक लढविणार नसल्याचे सांगत माघार घेतली. राष्ट्रवादीने विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी जाहिर केली नाही. दरम्यान, विजयसिंह मोहिते-पाटील यांचा मुलगा रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादीने संजयमामा शिंदे यांना उमेदवारी दिली.

भाजप रणजितसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी देणार की आणखी कोणाला याबाबत चर्चा चालु असतानाच सातार्‍याचे रणजितसिंह निंबाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अखेर आज (शुक्रवार) भाजपने देशातील 11 मतदार संघातील उमेदवारांची घोषणा केली. त्यामध्ये माढयातुन रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी जाहिर केल्याचे नमुद करण्यात आले आहे. आता माढयात संजयमामा शिंदे विरूध्द रणजितसिंह हिंदूराव नाईक निंबाळकर असा सामना रंगणार आहे.