ज्योतिरादित्य शिंदेंचा जेपी नड्डांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश, मिळालं राज्यसभेचं तिकीट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्यप्रदेशात काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदेंच्या राजीनाम्यानंतर राजकीय वातावरण तापले होते. ते भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा होती, त्यानंतर आता त्यांनी भाजपात अधिकृत प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशानंतर चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे. यावेळी त्यांनी दिल्लीत भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला. भाजपाकडून ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह हर्ष चौहान यांना राज्यसभेचं तिकीट दिलं आहे.

यावेळी जेपी नड्डा यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांचे अभिनंदन केले. यावेळी ज्योतिरादित्य यांनी नड्डा यांच्यासह पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले. यावेळी काँग्रेसवर टीका करताना ज्योतिरादित्य म्हणाले की काँग्रेसमध्ये राहून जनसेवा करता येणार नव्हती. मध्यप्रदेशात सरकार स्थापन झाल्यावर एक स्वप्न होते परंतु ते पूर्ण झाले नाही. मध्य प्रदेशात काँग्रेसने अनेक आश्वासनं दिली होती, परंतु ती पूर्ण केली नाही.

या दरम्यान ज्योतिरादित्य शिंदे यांनी अमित शाह आणि पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली या भेटीनंतर ते भाजपात प्रवेश करणार याची चर्चा रंगली होती. काल पंतप्रधानांना भेटण्यासाठी ते अमित शाह यांच्या गाडीने गेले आणि पुन्हा परत आले. यानंतर त्यांनी सोनिया गांधींना लिहिलेला राजीनामा समोर आला ज्यावर 9 मार्च 2020 ही तारीख होती.

शिंदे यांनी आपला राजीनामा 9 मार्चलाच दिलेला होता. काल ट्विट करत त्यांनी याची औपचारिक घोषणा केली आहे. या दरम्यान त्यांनी आज पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची देखील भेट घेतली. कालच्या धक्कादायक घडामोडींनंतर आज अखेर ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपात अधिकृत प्रवेश केला.

मध्यप्रदेशात सुरु असलेल्या राजकीय नाट्यादरम्यान नवीन राजकीय खिचडी शिजत होती. काँग्रेसला याची माहिती मिळताच काँग्रेस हायकमांड देखील सक्रिय झाले. त्यांनी शिंदे यांची नाराजी दूर करण्यासाठी सचिन पायलट यांना त्यांच्याशी बोलण्यासाठी पाठवले होते. कमलनाथ देखील ज्योतिरादित्य यांना भेटणार होते परंतु त्यात त्यांना अपयश आले. शिंदे यांच्या गटातील आमदारांनी राजकीय मार्ग निश्चित केला आणि 21 आमदारांनी शिंदेंना समर्थन दर्शवले. या आमदारांनी राजीनामा दिला. यामुळे कमलनाथ सरकार अल्पमतात आले आहे.