युतीने आठवड्याभरात जागावाटपाबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा… : घटक पक्षांचा इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. भाजप-शिवसेना युतीने येत्या आठवड्याभरात जागावाटपाबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा आम्ही चौथी आघाडी स्थापन करु. असा इशारा महादेव जानकर आणि सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.

नवी दिल्लीत निवडणूक आयोगाने कालच लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. सर्व पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर करण्याचे सुरु केले आहे. याचदरम्यान आघाडी असो किवा युती मोठे पक्ष लहानपक्षांना गृहीत धरतात. भरिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी वंचित आघाडी म्हणून तिसरी आघाडी तयार केली. त्याचप्रमाणे येत्या आठवड्याभरात भाजप-शिवसेना युतीने जागावाटपाबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा आम्ही चौथी आघाडी स्थापन करु. असा इशारा महादेव जानकर आणि सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.

भाजप-सेना युतीकडे आम्ही फक्त एक-एक जागा मागत आहोत. अन्यथा चौथ्या आघाडीसाठी आम्ही जुने मित्र नव्याने एकत्र येऊ शकतो. असेही त्यांनी म्हंटले.

विशेष म्हणजे, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर यांना सुप्रिया सुळे यांच्याविरोधात बारामती लोकसभा मतदार संघ तर रामदास आठवले यांना उदयनराजे भोसले यांच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली होती. तर सदाभाऊ खोत यांना माढा लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दिली होती. मात्र तिघांचाही या निवडणुकीत पराभव झाला होता. त्यावेळी महादेव जानकर आणि सदाभाऊ खोत यांना विधान परिषदेवर घेऊन मंत्रीपद देण्यात आले. याचबरोबर रामदास आठवले यांना राज्यसभेवर घेऊन त्यांना केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री पद देण्यात आले होते.