‘५ रुपयाची नोट घ्या आणि मठात जाऊन बसा’ : शरद पवार

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – सोलापूर लोकसभा मतदार संघात निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या महाराजांना सांगा, महाराज नमस्कार, ही ५ रुपयाची नोट घ्या आणि मठात जाऊन बसा. राजकारण हे तुमचे काम नाही. अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली आहे.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. याचदरम्यान, सोलापूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी, भाजपने नऊ, दहा महाराज निवडून आणले. हे महाराज भगवे कपडे घालून बसले संसदेत, पण गेल्या पाच वर्षात यांनी कधी तोंड उघडलं नाही की एक प्रश्न विचारला नाही. मी कोणत्याही महाराजांचा अनादर करीत नाही. पण महाराजांनी मठात जायचे सोडून इकडे कुठे. एका महाराजाला विचारले कसं चाललंय म्हणून. महाराज म्हणाले परमेश्वर की कृपा है, आज बेहतर है, कल या परसो बेहतर होगा. सबका कल्याण करेंगे, म्हणाले. काय कल्याण, इकडे प्यायला पाणी नाही, तरुणांना नोकऱ्या नाहीत त्याचे काय ? दिल्लीचे हे वारे सोलापुरातही आलेले पाहून नवल वाटले. पण सोलापूर हे पुरोगामी विचारांचे शहर आहे. लोक अशा गोष्टींना थारा देणार नाहीत, असा विश्वास आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, साधू संत कधी कोणाकडे काही मागत नाहीत, मागणारा संत असूच शकत नाही. सोलापुरात मला मताचा शिक्का द्या म्हणणारा महाराज मी देव आहे, असे सांगत असल्याचे वाचले. राजकारण हे महाराजांचे काम नाही व ही भोंदुगिरी समाज आणि देशाच्या हिताची नाही. त्यामुळे अशा महाराजांना सांगू या, महाराज नमस्कार, ही पाच रुपयाची नोट घ्या आणि मठात जाऊन बसा. राजकारण हे तुमचे काम नाही. असेही त्यांनी म्हंटले.