‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर महाराणा प्रतापसिंह जयंती पुण्यात साधेपणाने साजरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराणा प्रतापसिंह यांची 480 वी जयंती पुण्यात साधेपणाने साजरी करण्यात आली. या निमित्ताने राजपूत समाजाच्या दानशूर व्यक्तिंनी गरजूंना अन्नधान्याचे वाटप केले. कोरोना साथीवर मात करण्यासाठी एकत्र न जमता हिंदू राजपूत समाज, महाराणा प्रताप युवक मंडळ आणि राजपूत महिला मंडळ यांच्या सौजन्याने शासकीय नियमांच्या आधीन राहून महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेचे घरोघरी पूजन केले. अशी माहिती राजपूत समाजाचे विश्वस्त राजेंद्र परदेशी यांनी दिली.

राजपूत समाजातील दानशूर व्यक्तिंनी सव्वाशे ते दीडशे गरजूंना प्रत्येकी सुमारे दीड हजार रुपये किमतीचे अन्नधान्याचे वाटप केले. लॉकडाऊनच्या काळात प्रत्यक्ष जावून कीट वाटणे शक्य नसल्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गरजूंनी खरेदी केलेल्या धान्याची बिले ऑनलाईन पेमेंट द्वारे दिली आणि एक वेगळा पायंडा पाडला.

दरवर्षी महाराणा प्रतापसिंह उद्यानाजवळून जयंतीच्या दिवशी भव्य मिरवणूक काढण्यात येते, नंतर अनेक कार्यक्रम करण्यात येतात पण, यंदा साथीच्या पार्श्वभूमीवर अगदी साधेपणाने महाराणा प्रतापसिंहांचे स्मरण करून, त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून घरोघरी जयंती साजरी करण्यात आली.