विधानसभा 2019 : खडसेंविरोधात अपक्ष निवडणूक लढणार ‘हा’ शिवसेना नेता

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीमध्ये मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या विरोधात शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी दंड थोपटले आहेत. 2014 च्या निवडणुकीमध्ये युती तोडण्याचा निर्णय खडसे यांनी जाहीर केला होता. त्यामुळे स्थानिक शिवसैनिकांमध्ये खडसेंविषयी प्रचंड राग आहे. चंद्रकांत पाटील हे पक्षाचा राजीनामा देऊन अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मागील निवडणुकीमध्ये भाजप-शिवसेना युती तोडण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात राजकीय हाडवैर निर्माण झाले. त्यामुळे पाटील यांनी 2014 निवडणूकीत खडसेंविरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मदत केली होती. तरी देखील पाटील यांना पराभव स्विकारावा लागला होता. यावेळी देखील खडसे यांच्या विरोधात तगडा उमेदवार द्यावा म्हणून पाटील प्रयत्नशील आहेत. तसे झाल्यास भाजपचा एक गट त्यांना मदत करण्याच्या तयारी असल्याचे पाटील यांनी सांगितले.

तर शिवसेना राष्ट्रवादीला मदत करणार
राष्ट्रवादी काँग्रेसने कोणताही नवखा उमेदवार दिल्यास त्याला शिवसेना मदत करण्याच्या तयारीत आहे. तसेच पाटील स्वत: खडसेंच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. त्यांना मदत करण्यासाठी खडसे विरोधक एकवटले असून या निवडणुकीमध्ये पाटील यांना मदत करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Visit : Policenama.com