सत्ता स्थापनेबाबत शरद पवारांची ‘भविष्यवाणी’, सांगितला ‘हा’ पर्याय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्तास्थापनेसाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये मोठा सत्तासंघर्ष पहायला मिळत आहे. राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल अशी स्पष्ट भूमिका घेतली असतानाच सत्ता स्थापनेबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ता स्थापनेबाबत कोणाताही प्रस्ताव ठेवला नसल्याचा खुलासा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. त्यांच्या या खुलाशामुळे राजकीय संघर्ष आणखीनच पेटण्याची शक्यता आहे. दरम्यान, संजय राऊत यांच्याशी कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे पवारांनी स्पष्ट केले.

सत्ता स्थापनेबाबत आमच्यासमोर कोणताही प्रस्ताव नसल्याचे सांगत आम्ही विरोधी पक्षातच असणार आहोत या भूमिकेवर पवारांनी पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलं आहे. दरम्यान, काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यावर बोलताना पवार म्हणाले, राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या चर्चावर माझा विश्वास नाही. माझा काँग्रेसवर विश्वास आहे. ते शिवसेनेला कधीही पाठिंबा देणार नाहीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

शिवसेनेचे मुद्दे मान्य करावे लागतील –

सत्तेसाठी सध्या दोन्ही पक्ष वाद घालत असले तरी जो पक्ष दमेल त्याला नमतं घ्यावं लागेल. सत्तास्थापनेसाठी भजपकडे पर्याय नाही. भाजपने कितीही अपक्ष उमेदवारांना हाताशी धरलं तरी ते बहुमताचा आकडा पार करू शकणार नाही. त्यामुळे त्यांना शिवसेनेचे मुद्दे मान्य करावे लागतील असे शरद पवार यांनी सांगितले. शरद पवार हे राजकीय डावपेचासाठी ओळखले जातात. त्यामुळे त्यांनी व्यक्त केलेला अंदाज कितपत खरा ठरतो हे पहावे लागेल.

मुख्यमंत्री शिवसेनेचाच: राऊत –

शरद पवार यांनी शिवसेना किंवा भाजपला पाठिंबा देण्याची चर्चा नाकारल्याने पुन्हा एकदा राजकीय समीकरणं बदलली आहेत. तसंच आपला मुख्यमंत्री करण्याच्या शिवसेनेच्या महत्त्वाकांक्षेलाही धक्का बसला आहे. त्यामुळे आगामी काळात शरद पवार नेमकी काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. संजय राऊत यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत भाजपवर निशाणा साधला आहे. ‘मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार आहे. शिवसेना बहुमत सिद्ध करू शकते. अहंकार भल्याभल्यांना घेऊन बुडतो,’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Visit : Policenama.com