नागपूरची झाली ‘क्राईम सिटी’, प्रत्येक गोष्टीत अपयशी मुख्यमंत्र्यांच्या सरकारला मते देऊ नका : पवारांचे आवाहन

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – आज विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादीच्या बीडमधील राष्ट्रवादीच्या ५ उमेदवारांची नावे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी जाहीर केली. यावेळी त्यांनी पक्ष सोडून गेलेल्यांवर सडकून टीका करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही चांगलाच निशाणा साधला. नागपूरमध्ये गुन्हेगारीच्या वाढत्या प्रकरणांचा धागा पकडत त्यांनी फडणवीस यांना टोला लगावला.

तीनदा मंत्रिपद देऊनही पक्ष सोडून गेले :
बीडमधील राष्ट्रवादी पक्ष सोडून गेलेल्या जयदत्त क्षीरसागर यांच्यावर देखील पवारांनी सडकून टीका केली. त्यांनी म्हटले,” ज्यांना आम्ही तीनवेळा मंत्रीपदाची संधी दिली ते जयदत्त क्षीरसागर पक्ष सोडून गेले. यासाठीचे कारण विचारले तर सांगतात म्हणे विकास करायचा. पंधरा वर्षे मंत्री होते तेव्हा विकास केला नाही का ?”

शेतकरी आणि बेरोजगारीची समस्या सरकारमुळेच :
यावेळी त्यांनी शेतकरी आत्महत्येचा प्रश्न उपस्थित केला. राज्यात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून सत्ता दिली त्यांनी शेतकरी हिताचा कार्यक्रम राबवला नाही. भाजप सरकाने कर्ज माफी ऑनलाईन केली, यामध्ये ४० टक्केच लोकांना लाभ मिळला आणि ६० टक्के शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्ज तसेच आहे. त्यामुळे नव्या पिढीतील शेतकरी वर्ग अस्वस्थ असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात बेरोजगारांची भयानक परिस्थिती आहे. नोकरी नाही त्यामुळे बेरोजगारांची संख्या वाढली रोजगारसाठी केंद्रे आणि राज्य सरकारने पाऊले टाकले नाहीत म्हणून तरुणवर्गात नैराश्य आहे.

मुख्यमंत्र्यांना मते मागण्याचा अधिकार नाही :
राज्यातील भाजप सरकार बरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही पवारांनी निशाणा साधला. फडणवीसांनी पाच वर्षांत काम केलेच नाही मग त्यांना मत मागण्याचा काय अधिकार आहे ? ज्या ठिकाणी मुख्यंमत्री राहतात त्या नागपूर शहरात सगळ्यात जास्त गुन्हेगारी आहे. नागपूरची आज ‘क्राईम सिटी’ म्हणून ओळख आहे. असे म्हणत पाच वर्षांत प्रत्येक गोष्टीला ज्यांनी अपयश आणले त्यांच्याच हातात सरकार द्यायचे नाही असे त्यांनी नागरिकांना आवाहन केले.

Visit – policenama.com