हडपसर मतदार संघात पुन्हा ‘कमळ’ फुलणार की घड्याळाची ‘टिकटिक’, का ‘इंजिन’ बाजी मारणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीची मतदानप्रक्रीया आटोपल्यानंतर आता सर्वांना निकालाची उत्सुकता लागली आहे. मतदानाची प्रक्रीया संपल्यानंतर संध्याकाळी प्रसिद्ध झालेल्या एक्झीट पोलने राज्यातील संभाव्य कल दाखवला आहे. मात्र, काही मतदारसंघ असे आहेत ज्या ठिकाणी निकालाचा कल सांगणे अवघड आहे. अशा मतदारसंघामध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

राज्यात इतरत्र भाजप-शिवसेना महायुती मुसंडी मारताना दिसत असली तरी पुणे जिल्ह्यातील हडपसर मतदारसंघामध्ये झालेल्या तिरंगी लढतीमध्ये कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघातून भाजपने आमदार योगेश टिळेकर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून शहराध्यक्ष चेतन तुपे आणि मनसेचे गटनेता वसंत मोरे रिंगणात आहेत. योगेश टिळेकर यांच्या कार्यकर्त्यांनी योगेश टिळेकर हेच निवडणून येणार असल्याचा दावा केला आहे. तर मनसेचे उमेदवार वसंत मोरे यांनी प्रचारात आघाडी घेतल्याने त्यांच्या कार्यर्त्यांकडून देखील या जागेवर दावा केला आहे.

हडपसर मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसची ताकद असली, तरी येथील मतदारांचे शिवसेना, भाजप उमेदवाराला समर्थन राहिले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून ही बाब स्पष्ट होत आहे. मात्र राष्ट्रवादी आणि मनसेकडून चांगली लढत दिली जात असल्यामुळे ही लढत लक्षवेधी ठरली आहे. प्रत्येक उमेदवारांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे. मनसेच्या वसंत मोरे यांच्या कार्य़कर्त्यांनी केलेल्या प्रचारामुळे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेमुळे विरोधकांची धाकधुक वाढली आहे.

शिवसेनेकडून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मदत केली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे टिळेकरांना फटका बसणार किंवा कसे, हे महत्त्वाचे ठरणार आहे. तर राष्ट्रवादीचे चेतन तुपे यांना मतदारसंघात असलेले सर्व नगरसेवक मदत करणार का, वंसत मोरे कात्रजसह अन्य भागातील किती मते खाणार यावर हा निकाल अवलंबून राहणार आहे. तिन्ही उमेदवारांनी आपण विजयी होणार असल्याचा दावा केला असला तरी निकाला नंतर मतदारांनी कोणाच्या पारड्यात मत टाकले हे समजले.

Visit : Policenama.com