फक्त 17 दिवसात काँग्रेस – शिवसेनेत वादाची ‘ठिणगी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – २५ वर्षाची युती तुटल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आपला संसार सुरू केला. सुरुवातीला नाराजीचा सूर धरणाऱ्या काँग्रेसनेही शिवसेनेला पाठिंबा दिला. उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबरला महाविकासआघाडी या नव्या सरकारतर्फे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, या नव्या सरकारच्या १७ दिवसातच काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. स्वातंत्रवीर सावरकरांवरून निर्माण झालेला हा वाद चिघळला तर महाराष्ट्र सरकारच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आज दिल्लीतील रामलीला मैदानावर झालेल्या ‘भारत बचाओ’ या रॅलीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. मात्र त्यांच्या या विधानामुळे त्यांच्यावर देशभरातून टीकेला सुरुवात झाली आहे. त्यात आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील राहुल गांधी यांना चांगलच सुनावलं आहे. ‘आम्ही नेहरू आणि गांधींचा आदर करतो. सावरकरांचा अपमान सहन करणार नाही. सुज्ञास सांगणे न लगे,’ असे राऊत यांनीं ट्विटरच्या माध्यमातून राहुल गांधी यांना सुनावले आहे.

शिवसेना आणि काँग्रेसमध्ये अनेक विषयांवर टोकाचे मतभेद आहेत. त्यामुळे काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्यास तयार नव्हती. मात्र शरद पवार यांच्या पुढाकारामुळे काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिला. त्यात काँग्रेसचे दिल्लीतल्या नेत्यांमध्ये सावरकरांबद्दल कायम संतप्त भावना आहे. तर दुसरीकडे शिवसेनेला सावरकरांबद्दलचं प्रेम आहे. आता राहुल गांधींच्या या विधानामुळे हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

 

You might also like