…तर आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकतात, काँग्रेसच्या प्रवक्त्याचा भाजपला ‘इशारा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्यासाठी काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. निकालानंतर कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, कोणता पक्ष सत्तेत येईल हे समजेलच. तत्पूर्वी काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. निकालानंतर शिवसेनेला जास्त जागा मिळाल्या तर आदित्य ठाकरे मुख्यमंत्री बनू शकतात. राजकारणात काय काय होऊ शकते ? काहीही अशक्य नाही, असा सूचक इशारा काँग्रेसने भाजपला दिला आहे.

एक्झिट पोल नुसार शिवसेनेला जर राष्ट्रवादीने पाठिंबा दिला व यांना काँग्रसने बाहेरून पाठींबा दिला तर आदित्य ठाकरे मुख्यमंत्री बनू शकतात व ‘मी पुन्हा येईन’ म्हणून सांगणारे घरी बसू शकतात. युद्धात, प्रेमात सर्व माफ असतं असं सांगत एकप्रकारे शिवसेनेला बळ देण्याचा निर्णय राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी घेऊ शकते असं सूचक विधान त्यांनी केले आहे. दरम्यान, भाजपला स्वबळावर बहुमत मिळाल्यास शिवसेनेला सत्तेत वाटा देणार नसल्याचीही चर्चा आहे. त्यावर तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना हे प्रत्येक पक्षाला लागू होतं.

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपला शिवसेनेच्या मदतीशिवाय सत्ता स्थापन करता येणार नसल्याचा दावा केला आहे. तसेच शिवसेनेला 100 जागा मिळतील असा विश्वास त्यांनी बोलू दाखवला होता. तर उद्धव ठाकरे हे देखील शिवसेनेचा मुख्यमंत्री बसविणार असल्याची घोषणा केली होती. काही एक्झिट पोलनुसार शिवसेनेला 100 जागा मिळतील असे सांगण्यात आले आहे. जर असे घडल्यास काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर बहुमतासाठी लागणारा जादुई आकडा 145 गाठणे शिवसेनेला कठीण होणार नाही. त्यामुळे शिवसेनेला किती जागा मिळणार यावर पुढील राजकारण ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

Visit : Policenama.com