मुख्यमंत्र्यांनी काय थिल्लरपणा लावलाय !, …म्हणून फडणवीसांना आला राग

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात परतीच्या पावसाने हाहाःकार माजवला आहे. पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टी झालेल्या परिसराची पाहणी करण्यासाठी राज्यातील नेते नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी पुरग्रस्त भागांच्या दौऱ्यावर निघाले असताना थेट बांधावरुनच या दोघांमध्ये वाकयुद्ध रंगले आहे. मुख्यमंत्र्यांनी शेलक्या शब्दांत फडणवीसांच्या टीकेला उत्तर दिल्यानंतर पुन्हा एकदा फडणवीसांनी पलटवार केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संवेदनशील परिस्थितीत अतिशय थिल्लरपणा करत आहेत, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. इतक्या दिवसांतून आज दोन-तीन तासांसाठी बाहेर आला आहेत तर लगेच स्वत:ची तुलना मोदी साहेबांशी करु नका, असा टोला फडणवीस यांनी मुख्यमत्र्यांना लगावला आहे. सरकार चालवायला दम लागतो, असे म्हणत केंद्राने कोणतेही पैसे थकवले नसून राज्याचा जीएसटी कमी जमा झाल्याने त्याची भरपाई केंद्र सरकार करुन देत आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.

हिम्मत असेल तर…

अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी फडणवीस हे आज माढा आणि करमाळा दौऱ्यावर आले होते. तिथे नुकसानीची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या विधानाकडे लक्ष वेधले असता फडणवीस यांनी त्याला सडेतोड उत्तर दिलं आहे. केंद्र सरकारने नेहमीच महाराष्ट्राला मदत केली आहे. आता लोकांना तातडीने मदतीची गरज आहे. आशावेळी केंद्राकडे मदतीसाठी बोट दाखवण्याऐवजी हिम्मत असेल तर राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी, असे आव्हान फडणवीसांनी दिले आहे.

अजित पवार दिशाभूल करत आहेत

केंद्र सरकारने कर्ज काढून राज्याच्या जीएसटीचे पैसे दिले आहेत, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे जनतेची दिशाभूल करीत आहेत, असा आरोप फडणवीस यांनी केला. मला अर्थशास्त्र चांगले कळते असे सांगताना राज्याने 50 हजार कोटी कर्ज घेतले आहे. आणखी 70 हजार कोटी रुपये कर्ज काढण्याची राज्याकडे क्षमता आहे, असे फडणवीस म्हणाले. कर्ज काढा पण शेतकऱ्यांना मदत करा. आम्ही शेतकऱ्यांना केंद्राच्या मदतीची वाट न बघता 10 हजार कोटी रुपये मदत केली होती, अशी आठवण त्यांनी अजित पवारांना करुन दिली.