आधारकार्ड, ID कार्डसह शुक्रवारी मुंबईत ‘हजर’ रहा, उध्दव ठाकरेंचा आमदारांना ‘आदेश’

मुंबई : पोलीसनामा ऑनालाइन – एकीकडे दिल्लीत बड्या नेत्यांमध्ये राज्यातील सत्तास्थापनेवर चर्चा सुरु असताना आता शिवसेनेने 22 नोव्हेंबरला आपल्या सर्व पक्षांना मातोश्रीवर बैठकीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींच्या नेत्यांची खलबत सुरु आहेत, संजय राऊत पवारांची भेट घेत आहेत. तर मुंबईत शिवसेना सत्तास्थापनेच्या तयारीला लागली आहे.

मातोश्रीवर होणाऱ्या या बैठकीला हजर राहताना सर्व आमदारांना आपल्या आधारकार्डसह, ओळखपत्र आणि 5 दिवसांचे कपडेदेखील सोबत आणा असे सांगण्यात आल्याचे कळते आहे. राज्यात महाशिवआघाडी सरकार स्थापनेच्या तयारीला लागल्याचे हे संकेतच आहेत. याचसाठी उद्या दिल्लीत आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत किमान समान कार्यक्रमावर अंतिम स्वरुप देण्यात येणार आहे. यानंत शिवसेनेशी पुढील बोलणी होतील असे सांगण्यात येत आहे.

राज्यपालांकडून अट घालण्यात आली आहे की महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन करण्यास पाठिंबा आहे असे सूचित करणारे आमदारांचे निळ्या शाईतील सहीचे स्वतंत्र पत्र सादर करावे. शिवाय आमदारांच्या सह्या जबदस्तीने किंवा अन्य माध्यमांतून घेण्यात आलेल्या नाहीत असे प्रमाणित करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या नेत्यांची प्रतिस्वाक्षरी या पत्रांवर असावी.

राज्यपालांच्या अटीने पर्यायी सरकार स्थापनेस उशीर होत आहे. त्यामुळे आमदारांची वैयक्तिक स्वाक्षरी मिळावी यासाठी नेत्यांना धावपळ करावी लागत आहे. असे असताना आमदार देखील पाठिंब्याच्या पत्रावर स्वाक्षरी करण्याआधी आपल्या मागण्याचा रतीब लावत आहेत असे कळते आहे. आमदारांनी ओळख परेड घेण्यास राज्यपालांनी नकार दिला आहे. त्याऐवजी आमदारांच्या पठिंब्याचे पत्र सहीनिशी सादर करावे असे पक्षांच्या नेत्यांना सांगण्यात आले आहे. याआधीच्या काही राज्यपालांनी देखील हीच पद्धत अवलंबली होती. त्यामुळे पक्षांचा देखील नाईलाज आहे. त्यामुळेच शिवसेनेने आपल्या आमदारांना येताना सोबत आधार कार्ड आणि ओळखपत्र आणण्यास सांगितले आहे. त्यामुळे एकीकडे दिल्लीत बैठका आणि राज्यात सत्तास्थापनेला वेग हे चित्र दिसू लागले आहे.

Visit : Policenama.com