राज्यातील सरकार कोसळल्यानंतर अमित शहा कडाडले, शिवसेनेवर केली ‘खरमरीत’ टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील भाजप सरकार बहुमत चाचणी होण्याआधीच कोसळले असताना आता गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेनेने युती धर्माचे पालन केले नाही आणि जनादेशाचा अनादर केला. शिवसेनेचा एकही आमदार असा नव्हता ज्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावला नसेल. एवढेच काय पण आदित्य ठाकरे यांनी सुद्धा मोदींचा फोटो लावला होता अशा प्रकारचा टोला अमित शहा यांनी लगावला आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमित शहा म्हणाले की, आम्ही घोडेबाजार केला नाही. एका हॉटेलमध्ये आमदारांना ठेऊन एकमेकांशी सरकार बनवणे म्हणजे भाजपचा पराभव करणे नाही. हे आमच्यावर घोडेबाजाराचा आरोप करतात मात्र पद देऊन इतर पक्षांसोबत सत्ता स्थापन करणे हा घोडेबाजार नाही का ? असा सवाल देखील अमित शहा यांनी उपस्थित केला आहे.

शिवसेनेने जनतेचा कौल मान्य केला नाही आणि युती धर्माचे पालन केले नाही. तसेच आम्ही मुख्यमंत्री पदाबाबत कोणताही शब्द दिला नव्हता असेही अमित शहा यावेळी म्हणाले. तसेच प्रचारादरम्यान देखील आम्ही देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील असेच सांगत होतो. सर्व मुद्द्यांवर आमची भूमिका स्पष्ट आहे निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांचं अयोध्या दर्शन करण्याचा प्लॅन होता परंतु मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी आपला हा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचा आरोप देखील अमित शहा यांनी यावेळी केला.

उद्या उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाची शपत घेणार आहेत. शिवाजी पार्क मैदानावर या शपथविधी सोहळा पार पडणार आहे. विशेष म्हणजे या सोहळ्यासाठी इतर राज्यातील मुख्यमंत्री तसेच अनेक केंदीय मंत्री देखील उपस्थित असणार आहेत. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे देखील उपस्थित राहणार का ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

Visit : Policenama.com