महाराष्ट्रातील ‘सत्तापेचा’वर सुप्रीम कोर्टात आता उद्या सुनावणी, ‘ही’ कागदपत्रे सादर करा

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील सत्तास्थापनेबाबत शिवसेनेनं शनिवारी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी झाली. न्यायमुर्ती एनव्ही रमण्णा, न्यायमुर्ती अशोक भूषण, न्यायमुर्ती संजीव खन्ना यांनी या याचिकेवर उद्या सुनावणी होईल असं सांगितलं. दरम्यान, राज्यपालांनी कोणत्या आधारे राष्ट्रपती राजवट उठवली, शपथविधी करून घेतला यासंदर्भातील कागदपत्रे उद्या सकाळी 10.30 वाजेपर्यंत सादर करावी असं सुप्रीम कोर्टानं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना सांगितलं आहे.


राज्याच्या राजकारणात शनिवारी भल्या सकाळी मोठा राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादीचे बडे नेते अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी केली. शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपालांनी केलेले हे कृत्य संविधानानुसार नाही तसेच अजित पवारांनी जे 54 आमदारांच्या सहयांचे पत्र राज्यपालांकडे सुपूर्द केले आहे ते भाजपला पाठिंबा देण्यासाठी नव्हते असे अनेक मुद्दे समोर आले. दरम्यान, शिवसेनेने सत्तास्थापनेबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. सुप्रीम कोर्टानं शिवसेनेची याचिका दाखल करून घेतली.


त्यानंतर यावरील सुनावणी रविवारी सकाळी 11.30 वाजता होईल असे सांगण्यात आलं होतं. त्यानुसार सुप्रीम कोर्टात रविवारी सकाळी 11.30 वाजता सुनावणी झाली. पक्षकारांचे वकिल म्हणून कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी यांनी बाजू मांडली तर दुसर्‍या बाजूनं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता तर भाजपच्या वतीने मुकूल रोहतगी यांनी बाजू मांडली. शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर तर काँग्रेसकडून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यावेळी सुप्रीम कोर्टात उपस्थित होते. सुप्रीम कोर्टात बाजु मांडताना कपिल सिब्बल यांनी सांगितले की, भाजपकडे बहुमत असेल तर त्यांनी आजच्या आज बहुमत सिध्द करावं.


राज्यपालांनी एवढया कमी वेळात भाजपकडे बहुमत असल्याचं कसं तपासलं, एवढया कमी वेळात राज्यपालांना बहुमताची खात्री कशी काय पटली, फडणवीस यांनी समर्थनाच पत्र राज्यपालांनी नेमक्या कुठल्या वेळेला दिलं असा सवाल देखील उपस्थित करण्यात आला. कपिल सिब्बल पुढं म्हणाले, राष्ट्रपती शासन कधी हटवलं हे देखील कळालं नाही आणि 2 तासात शपथविधी कसा झाला. दरम्यान, न्यायमूर्ती एनव्ही रमण्णा यांनी राज्यपालांना खात्री पटल्यानंतर ते सत्तास्थापनेस परवानगी देऊ शकतात असं सांगितलं. शेवटी कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात भाजपनं आजच बहुमत सिध्द करावं या मागणीवर जोर दिला.

तब्बल 15 मिनीटांपेक्षा अधिक वेळ कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात युक्तीवाद केला. कर्नाटक प्रकणात सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला होता. त्याप्रमाणे सुप्रीम कोर्टानं निर्णय द्यावा अशी मागणी देखील कपिल सिब्बल यांनी केली आहे. कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांच्याकडून पुन्हा पुन्हा कर्नाटक प्रकरणाचा दाखला सुप्रीम कोर्टात देण्यात आला. दरम्यान, मुकूल रोहतगी यांनी राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान दिलं जाऊ शकत नाही असं सुप्रीम कोर्टात सांगितलं. त्यावर न्यायमुर्ती एनव्ही रमण्णा यांनी राज्यपाल कोणालाही शपथविधीसाठी बोलावू शकत नाहीत अशी टिप्पणी केली. सुप्रीम कोर्टात युक्तीवाद करताना अभिषेक मनु सिंघवी आणि मुकूल रोहतगी यांच्यात चांगलच घमासान झालं.

Visit : Policenama.com