आपण उष्माघाताचा धोका टाळू शकतो

पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात १५ मार्चपासून आतापर्यंत उष्माघातामुळे २ जणांचा मृत्यू झाला आहे. औरंगाबाद आणि धुळे याठिकाणी प्रत्येकी एक मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याच्या विविध रुग्णालयात उन्हाचा त्रास झालेल्या ८८ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यात नागपूरमध्ये सर्वाधिक म्हणजेच ६७ रुग्ण आहेत. अशाप्रकारे सध्या उन्हाचा तडाका चांगला जाणवत आहे. उष्माघाताचा हा त्रास टाळण्यासाठी काही काळजी घेतली पाहिजे. ही काळजी घेतल्यास आपण उष्माघाताचा धोका टाळू शकतो.

उष्माघातापासून वाचण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. दररोज किमान ८ ग्लास पाणी प्यायला पाहिजे. तसेच थंड पाण्याने आंघोळ करावी. या काळात हलका आणि पोषक आहार घ्यावा. आहारात काकडी, कलिंगड, नारळ अशा पाणीदार फळांचा समावेश करावा. बाहेर जाताना पांढरे, सैल कपडे आणि कॉटनचे कपडे घालावेत. जास्त वेळ बाहेर काम असेल तर त्वचेवर किंवा कपड्यांवर थोडे पाणी शिंपडावे.

सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत बाहेर पडणे शक्यतो टाळावे. उन्हात जाताना छत्री किंवा टोपीचा वापर करावा. अतिरिक्त मद्यपान, साखरयुक्त पेयं, कॅफेन जास्त असलेलं पेय टाळावे. यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. अतिप्रमाणात व्यायाम करणे उन्हाळ्यात टाळावे. लहान मुले आणि वृद्धांमध्ये डिहायड्रेशनची लक्षणे दिसतात का यावर लक्ष ठेवावे. जर अशी लक्षणे दिसल्यास ताबडतोब त्यांना डॉक्टरांकडे न्यावे.

वाढत्या तापमानामुळे अनेकांना आरोग्याच्या समस्या जाणवू लागल्यात. चक्कर येणे, उलट्या होणे, ताप येणे आदी लक्षणे आढळतात. उन्हामुळे अंगातून पाणी घामावाटे निघून जाते. त्यामुळे या काळात अधिक प्रमाणात पाणी प्यावे. ओआरएस पावडर जवळ बाळगावी. चक्कर येत असल्याचे वाटल्यास सावलीत बसावे. हा त्रास अधिक जाणवल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जावे.