अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भातील UGC च्या निर्णयाला आदित्य ठाकरेंकडून ‘आव्हान’, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्य सरकारनं काही दिवसांपूर्वी राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना सरासरी मार्क देऊन त्यांना उत्तीर्ण करणार असल्याचे जाहीर केलं होतं. परंतु काही दिवसांपूर्वी यूजीसीनं अखेरच्या वर्षाच्या विद्यर्थ्यांच्या परीक्षा सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत घेण्याच्या सूचना सर्व राज्यांना दिल्या आहेत. परंतु परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयांवर राज्य सरकार ठाम आहे.

दरम्यान, यूजीसीच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. यूजीसीने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या घेतलेल्या निर्णयाला आव्हान देत राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. परंतु कोर्टाने अद्याप ही याचिका सुनावणीसाठी स्विकारलेली नाही. ठाकरे सरकारने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी यापूर्वीच पॅरामीटर्स बनवले होते, त्यामुळे यूजीसीच्या नव्या निर्णयानंतर राज्य सरकार संतप्त झालं आहे.

30 सप्टेंबरपूर्वी परीक्षा घेण्याच्या UGC च्या सूचना

कोरोना विषाणूच्या साथीमुळे शालेय ते माहाविद्यालयीन स्तरापर्यंतच्या परीक्षा देशभर परिणाम झाला. बोर्डाच्या परीक्षा देखील शाळांमध्ये रद्द केल्या गेल्या, परंतु केंद्र सरकारने विद्यापीठामध्ये अंतिम वर्षाची किंवा सेमेस्टर परीक्षा घेण्याचे ठरविले होते. 6 जुलै रोजी यूजीसीने विद्यापीठ परीक्षांबाबत सुधारीत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली, ज्या अंतर्गत सर्व विद्यापीठांना 30 सप्टेंबर पूर्वी अंतिम वर्ष किंवा सेमेस्टर परीक्षा पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.