महाराष्ट्रावर कर्जाचा डोंगर ! तब्बल 57 हजार कोटींची कर्जवाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सर्वांचे लक्ष शुक्रवारी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे लागले आहे. असे असताना मात्र आता शुक्रवारी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात राज्याची बिकट स्थिती समोर येण्याची शक्यता आहे. राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी विधानसभेत मांडला. यात राज्याची महसुली तूट २० हजार २९३ कोटींनी वाढली आहे. तसेच दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राची पिछेहाट झाली आहे. राज्यावर ७१ हजार ६४२ कोटींचं कर्ज आहे. एकूणच आर्थिक पाहणीत राज्याची पीछेहाट झाली आहे.

राज्य सरकार समोर आव्हान

राज्यावर कर्जाचा बोजा वाढत आहे. त्यामुळे सार्वत्रिक निवडणुकीनंतर नव्याने सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारसमोर आर्थिक घडी बसवण्याचे आव्हान आहे. नुकताच राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी योजना लागू केली आहे. त्याचे परतावे देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जात आहे. तसेच ऐन उन्हाळ्यात विदर्भ तसेच काही भागात अवकाळी पाऊस झाल्यामुळे तेथील शेतकरी देखील सरकारकडून आर्थिक मदतीच्या अपेक्षेत आहेत.

शेतकऱ्यांना अर्थसंकल्पातून मोठ्या अपेक्षा

कोल्हापूरचा महापूर, अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव मदतीची अपेक्षा आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पुरवण्या मागण्या मांडण्यात आल्या आहेत. यंदा वित्त खात्याकडून २४ हजार ७१९ कोटींच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या. मात्र अर्थसंकल्पात सर्व विभागाला पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध केला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपू्र्वी सभागृहात दिली होती.

महाराष्ट्र पाचव्या स्थानी

दरडोई उत्पन्नात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची पिछेहाट झाली आहे. महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न १, ९१, ७३६ रुपये आहे. देशात दरडोई उत्पन्नात हरियाणा अव्वल असून तेथील उत्पन्न २,२६,६४४ रुपये आहे. त्याखालोखाल कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू ही राज्ये आहेत. महाराष्ट्र पाचव्या स्थानी आहे.