महाराष्ट्रासह ’या’ राज्यांचाही युजीसीच्या निर्णयाला विरोध

पोलिसनामा ऑनलाईन – विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) अंतिम वर्षाच्या परीक्षा सप्टेंबर अखेरपर्यंत घेण्याचा आदेश काढला आहे. त्यामुळे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये देखील गोंधळ सुरू झाला. विविध राज्यातील मंत्र्यांनी याबाबत केंद्राबरोबर पत्रव्यवहार करणार असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काही राज्यांनी परीक्षांच्या तयारीस सुरुवात केली आहे.

यूजीसीने राज्यातील सर्व विद्यापीठांना गाईडलाईन्स पाठवल्या आहेत. अंतिम वर्षांच्या परीक्षा सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याचे निर्देश युजीसीनं दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसमोर पुन्हा एक संभ्रम निर्माण झाला आहे. युजीसीने दिलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रात सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेणे अशक्य असल्याचे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे. अंतिम वर्षांच्या परीक्षांसदर्भात आम्ही महाराष्ट्रातील सर्व कुलगुरू आणि विविध शैक्षणिक संस्थांचे संचालकांसोबत चर्चा केली. मात्र, 30 सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेत येणार नाही, अशा प्रतिक्रिया सर्व कुलगूरू आणि शिक्षण संचालकांनी दिली आहे. त्यामुळे अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच यूजीसीसोबत पत्रव्यवहार करुनच राज्य सरकारने अंतिम परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता, असंही सामंत यांनी यावेळी नमूद केले. दुसरीकडे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी महाविद्यालये आणि विद्यापीठामध्ये होणार्‍या परीक्षा रद्दच करण्यात याव्या याबाबत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याशी पत्रव्यवहार करणार आहेत. पंजाबमध्ये कोरोनाची पॉझिटिव्ह प्रकरणे वाढू लागली आहेत, त्याचबरोबर सप्टेंबरमध्ये यामध्ये सर्वाधिक वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्याबाबत जोखीम घेण्यास तयार नसल्याची प्रतिक्रिया पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.