Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात 3870 नवे ‘कोरोना’ पॉझिटिव्ह तर 101 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात आज कोरोना संसर्गामुळे 101 जणांचा मृत्यू झाला तर 3 हजार 870 रुग्णांचे निदान झाले आहे. एकाच दिवसातील रुग्णसंख्येचा हा नवा उच्चांक ठरला आहे. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची सख्या 1 लाख 32 हजार 075 इतकी झाली आहे. तर 6170 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 60 हजार 147 रुग्णांवर उपचार सुरु आहेत तर रुग्ण बरे होण्याचा दर 49.78 टक्के एवढा असून आज राज्यात 1591 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 64 हजार 744 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात आज 170 नव्या कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी 101 रुग्णांचा मृत्यू गेल्या 24 तासांत झाला आहे तर 69 मृत्यू मागील काही दिवसांतील आहेत. याची नोंद आजच्या आकडेवारीत करण्यात आली आहे. 101 मृत्यूपैकी सर्वाधिक 41 मृत्यू मुंबईत झाले आहेत. त्या खालोखाल ठाणे महापालीका हद्दीत 29, पुणे 14, नाशिक 7, अकोला 4 तर अमरावती, बुलढाणा, वाशिम, लातूर, औरंगाबाद, अहमदनगर येथे प्रत्येकी एका रुग्णाचा कोरोनामुळे आज मृत्यू झाला आहे.

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 49.78 टक्के असून राज्यातील मृत्यू दर 4.67 टक्के इतका आहे. सध्या राज्यात 6 लाख 66 लोक होम क्वारंटाइनमध्ये असून 26 हजार 287 लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.