दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे मोफत पास बंद

तासगाव : पोलीसनामा ऑनलाईन – दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांनामोफत पास देण्यात येत होते. मात्र दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र अजून संपले नसताना जिल्हा नियंत्रकांनी १ एप्रिलपासून मोफत पास वाटप बंद करण्याचे आदेश सर्व आगार प्रमुखांना दिले आहेत.

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना उर्वरित शैक्षणिक वर्षात मोफत एसटी प्रवासाची सवलत देण्यात येणार आहे. याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ऑक्टोबरमध्ये केली होती. त्यानुसार दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना एसटी प्रवासाचे मोफत पास दिले जात होते. परंतु जिल्हा नियंत्रक अमृता ताम्हणकर यांनी मात्र १ एप्रिलपासून मोफत पास बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

२०१८-१९ च्या दुसऱ्या सत्रातील परिक्षा एप्रिल महिन्यात होणार आहेत. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मोफत पासची मुदत समाप्त होणारे विद्यार्थी – विद्यार्थीनी नूतनीकरण करण्यासाठी आगारात जात आहेत. परंतू सवलत मार्च अखेरीस बंद झाली असल्याचे सांगून मोफत पास देण्यास नकार दिला जात आहे.

मोफत एसटी प्रवासाची सवलत योजना लागू करताना परिवहनमंत्री दिवाकर रावते म्हणाले होते की, ‘पावसाअभावी अन्नदाता शेतकरी सध्या अडचणीत आहे. ग्रामीण भागातील इतर लोकही दुष्काळसदृश परिस्थितीमुळे अडचणीत आहेत. शिवाय शेतकरी आणि ग्रामीण भागातील लोक हे एसटीचे बहुतांश प्रवासी असल्याने एकप्रकारे ते एसटीचे अन्नदाते आहेत. सध्या शेतकऱ्याच्या आणि ग्रामीण भागात लोकांच्या अडचणीच्या काळात त्यांना मदत करणे हे एसटीचेही कर्तव्य आहे. असे विधान मोफत एसटी प्रवासाची सवलत योजना लागू करताना परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केले होते मात्र आता अचानक मोफत पास बंद करण्यात आले आहेत.