राज्यभरात उष्णतेच्या पार्‍याची अचानकपणे उसळी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यभरात पावसाने विश्रांती घेताच तापमानाने अचानक उसळी घेतली आहे. जवळपास सर्वच ठिकाणी पाच ते सहा अंश सेल्सियसने तापमान वाढले आहे. ऑक्टोबर हिटआधीच सप्टेंबरमधील तपमानाने यंदा उच्चांक गाठला आहे. समुद्रारावरून येणारे वाष्पयुक्त वारे दक्षिणेकडे वळल्याने बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती दूर होऊन तापमानात वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्यातील विविध भागात जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पाऊस कोसळला. या कालावधीत अगदी तुरळक ठिकाणीच दिवसाचे कमाल तपमान 30 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले होते. ऑगस्टच्या शेवटच्या आठवडयापर्यंत काही तुरळक भाग वगळता राज्यात सर्वत्र दिवसाचे कमाल तापमान सरासरीच्या आसपास आणि 30 अंशांच्या खाली होते. कमी-अधिक प्रमाणात पाऊस असल्याने रात्रीचे किमान तापमानही सरासरीच्या आसपास होते. त्यामुळे वातावरणात गारवा होता. मात्र, पावसाने विश्रांती घेतल्यापासून तपमानात झपाट्याने वाढ सुरू झाली. एकाच आठवडयामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक आदी शहरांच्या कमाल तपमानात तब्बल 5 ते 6 अंशांनी वाढ नोंदविली गेली आहे. अरबी समुद्रातून पश्चिमेकडून बाष्प घेऊन येणार्‍या वार्‍यांमुळे राज्यात या काळात ढगांची निर्मिती होते. मात्र, सध्या हे वारे केरळच्या किनार्‍याकडे वळले आहेत. परिणामी राज्यात ढगांची निर्मिती तुरळक ठिकाणीच होत आहे.