विधानसभेत पहिल्या बाकावर बसण्यासाठी विक्रमी मतांनी निवडून द्या : हर्षवर्धन पाटील

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – गेल्या पाच वर्षात तालुक्यात शेतीच्या पाण्याबरोबरच बेरोजगारीची समस्या वाढली त्यामुळे तालुक्याचे वाटोळे झाले आहे. याला लोकप्रतिनिधीच जबाबदार असून यामुळे मागील निवडणूकीत झालेला पराभवाचा वचपा काढायचा असून आत्ता काठावर पास नको तर विधानसभेत पहिल्या बाकावर बसण्यासाठी विक्रमी मतांनी विजयी करण्याचे आवाहन माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री व भारतीय जनता पार्टीचे इंदापूर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे जाहीर सभेत बोलताना केले.

भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कर्मयोगी शंकरराव भाऊ यांचे समाधी दर्शन घेतले व त्यानंतर इंदापूरचे ग्रामदैवत अंबाबाई, चाँदशी वलीबाबांचा दर्गाह, आंबेडकर नगर येथील बुद्ध विहार येथे दर्शन घेतले. त्यानंतर श्रीराम वेस येथून मुख्य बाजारपेठेतून पदयात्रा काढून शक्तीप्रदर्शन केले व तहसिल कार्यालय नविन प्रशासकीय इमारत शेजारील जेष्ठ नागरिक संघ कार्यालयाजवळ पदयात्रेचे जाहीर सभेत रुपांतर झाले यावेळी भाजप तालुकाध्यक्ष नाना शेंडे सभेच्या अध्यक्षस्थानी होते.
Indapur

पाटील पुढे म्हणाले, लोकसभेत आमची मदत घेतली मात्र विधानसभेत नेहमीप्रमाणे फसवणूक केली. काँग्रेसने लक्ष घातले नाही यामुळे जनतेच्या हितासाठी भाजप मध्ये प्रवेश केल्याचे पाटील यांनी सांगितले. आता एक सोडून शेजारचे सर्व दादा आपल्या पाठीशी आहेत, त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही. त्याचप्रमाणे आता दादांची अवस्था काय झाली कधी रडत्यात तर कधी पडत्यात असे म्हणत अजित पवार यांच्यावर टीका केली.

विरोधी पक्षाचा आमदार असतानाही चौदाशे कोटी आणल्याचा खोटा प्रचार लोकप्रतिनिधी करत आहेत. मात्र नीरा-भीमा त्याचप्रमाणे खडकवासल्याचे पाणी तालुक्याला आले त्यामुळे 25 हजार कोटी रुपयांचे तालुक्याचे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांचा प्रपंच धोक्यात आला असेही पाटील यांनी भरणे यांच्या वरती आरोप केला त्यामुळे अशा लोकप्रतिनिधी घरी बसल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला. मात्र आपण पुढील काळामध्ये शिक्षण, आरोग्य उद्योग पाणी आदी सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही सांगितले.

visit : Policenama.com