ठाण्यात ‘महाविकास’ आघाडीत ठिणगी, नेमकं काय झालं ‘ते’ जाणून घ्या

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून राज्यात महाविकास आघाडीत बिघाडी होत असून कोणत्याही निर्णय प्रक्रियेत सामावून न घेतल्याने काँग्रेस पक्ष नाराज असल्याचे पहायला मिळत आहे. तीच नाराजी आता ठाण्यात उघडपणे पहायला मिळत आहे. एकीकडे राष्ट्रवादीने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र देऊन आम्हालाही बैठकीला बोलवा, अशी मागणी करत नाराजी व्यक्त केली आहे.

दुसरीकडे काँग्रेसने आता शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधत आम्हाला दोघांपैकी कोण सामावून घेतो, असा सवाल विचारला आहे. कोविड रुगणालयाचा शुभारंभ तुम्हीच करता, पालिकेत काही शहराच्या दृष्टीकोनातून बैठक होतात, त्यावेळेसही आम्हाला डावलण्यात येते, असा धक्कादायक आरोप काँग्रेसचे प्रदेश सदस्य राजेश जाधव यांनी केला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात काँग्रेसची नाराज असून प्रत्येक ठिकाणी डावलले जात असल्याचे वारंवार महाविकास आघाडीत ठिणगी पडत आहे.

आता ही ठिणगी ठाण्यात पडू लागली आहे. राज्यात तर आम्हाला डावलले जातेयच, परंतु आता ठाण्यातही आम्हाला डावलले जात असल्याचे मत राजेश जाधव यांनी व्यक्त केले आहे. राष्ट्रवादीकडून नाराजी व्यक्त करीत थेट आदित्य ठाकरे यांना निवेदन देऊन ठाण्यात जर कोणी मंत्री येणार असेल तर त्याची माहिती आम्हाला दिली जात नाही, असा आक्षेप त्यांनी घेतला आहे. मात्र, आता शिवसेना आणि राष्ट्रवादी दोघेही आम्हाला डावलत असल्याने आधी कधी आम्ही नाराजी व्यक्त केली का ? उलट आम्ही महाविकास आघाडीचे घटक म्हणून एकत्रितपणे काम करण्याची इच्छा व्यक्त करत होतो. परंतु आता आम्हाला कोणत्याही निर्णय प्रक्रियेत सामावून घेतले जात नाही. काँग्रेसला शिवसेना, राष्ट्रवादीकडून वारंवार डावलले जाते, ठाण्यात काँग्रेसला विचारातच घेतले जात नाही.

जेव्हा शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रित काम करत होते, तेव्हा आम्हाला विश्वासात घेतले का ? कोविड हॉस्पिटलचा शुभारंभ, शहराच्या विकासच्या दृष्टीने कोणी आम्हाला विचार घेत नाही. आम्ही देखील महाविकास आघाडीचे घटक आहोत, आम्हाला देखील शहराची आणि येथील नागरिकांची काळजी आहे. परंतु वारंवार डावलून आमच्यावर अन्याय का ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. आता बिघाडीची ही ठिणगी ठाण्यात येऊन पोहचली असून जाधव यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी आता तरी काँग्रेसला विश्वासात घेते का हे पहावे लागणार आहे.