पिंपरीच्या महापौरपदी माई ढोरे तर उपमहापौरपदी तुषार हिंगे

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या गटाच्या भाजप नगरसेविका माई ढोरे यांची पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौरपदी वर्णी लागली आहे. तर उपमहापौरपदी क्रीडा समितीचे सभापती तुषार हिंगे यांना नाव चर्चेत नसतानाही उपमहापौर पदाची लॉटरी लागली आहे.

राष्ट्रवादीच्या नगरसेविका स्वाती उर्फ माई काटे यांचा माई ढोरे यांनी 40 मतांच्या फरकाने पराभव केला. माई ढोरे यांना 81 मते मिळाली. तर काटे यांना 41 मते मिळाली. उपमहापौर पदाचे उमेदवार नगरसेवक राजू बनसोडे यांनी माघार घेतल्यामुळे तुषार हिंगे बिनविरोध निवडुन आले.

शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मदत केली. तर भाजपचे नगरसेवक शितल शिंदे हे मतदान सुरू होताच सभागृहाबाहेर पडले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील महापौर राहुल जाधव यांचा पदाचा कार्यकाळ संपल्यामुळे त्यांनी महापौरपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे महापौरपदाची निवडणूक जाहीर झाली.

पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शंतनू गोयल यांच्या अध्यक्षतेखाली आज शुक्रवारी (दि. २२) रोजी सकाळी अकरा वाजता विशेष सभेचे आयोजन केले होते. महापालिकेच्या या विशेष सभेत मतदान घेण्यात आले व त्यानुसार महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक पार पडली.

Visit : Policenama.com