Coronavirus : ‘करोना’ग्रस्तांचा सर्व खर्च राज्य सरकार करणार

पोलीसनामा ऑनलाईन टीम – नागरिकांनो घाबरू नका, तुमच्या मदतीसाठी आणि कोरोेनाच्या उच्चाटनासाठी राज्य सरकार सरसावले आहे.  कोरोनाग्रस्त रुग्णांचा खर्च राज्य सरकारच करणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात 26 करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालयांपाठोपाठ आता मॉल्सही बंद राहणार आहेत . दरम्यान देशात कोरोनाची लागण झालेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना हे राष्ट्रीय संकट म्हणून केंद्राने जाहीर केले आहे. मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदतही जाहीर केली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारनेही खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाग्रस्तांचा सगळा खर्च उचलण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मॉल्स , शाळा आणि महाविद्यालये 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोराना संशयागस्त ज्या रुग्णांमध्ये सुधारणा होते आहे त्यांना घरी सोडण्यात येईल. कुठेही गर्दी होऊ नये म्हणून आणि खबरदारीचा उपाय म्हणून 30 मार्चपर्यंत मॉल्स बंद ठेवले जाणार आहे. रेल्वे आणि बस-सेवा अत्यावश्यक सेवा आहेत त्या बंद करता येणार नाहीत. अनावश्यक प्रवास टाळा. ‘वर्क फ्रॉम होम’ ज्या कंपन्यांना शक्य आहे ते त्यांनी अंमलात आणावे असे निर्देश ठाकरेंनी दिले आहेत. चित्रपटगृह किंवा मॉल्स सुरु ठेवले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. जीवनाश्यक  वस्तूंची दुकानेही सुरु राहतील, मात्र अनावश्यक गर्दी, प्रवास टाळावा. योग्य ती खबरदारी घ्यावी असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.