Mann ki Baat : देश ‘अनलॉक’ होऊ लागलाय, आता अधिक ‘सावध’ राहण्याची गरज – PM मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना विषाणाचू प्रादुर्भाव वाढत असल्याने मागील सव्वादोन महिन्यापासून देशव्यापी लॉकडाऊन सुरु आहे. आता केंद्र सरकारने देशातील नागरिकांवर घालण्यात आलेले निर्बंध हळूहळू हटवण्याच्या दिशेने पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी रविवारी (दि.31) मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील नागरिकांना संबोधित केले. देशाच्या अर्थव्यवस्थेची चक्रे आता फिरू लागली असून, नागरिकांवरील बंधने आता हळूहळू कमी होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशवासियांनी अधिक सावध राहण्याची गरज असल्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, मी गेल्या वेळी मन की बातच्या माध्यमातून जेव्हा संवाद साधला होता, तेव्हा देशातील बहुतांश व्यवहार बंद होते. मात्र, आता देशाच्या अर्थव्यवस्थेची चक्र पुन्हा एकदा फिरु लागली आहेत. सर्व खबरदारी घेऊन रेल्वे आणि विमान सेवा सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे आता अनलॉक 1 च्या काळात आपल्याला अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. आता सहा फुटांचे अंतर आणि मास्क परिधान करणे आवश्यक आहे.

सर्वाधिक फटका गरीब आणि श्रमिकांना
मन की बात कार्यक्रमात पंतप्रधानांनी सांगितले की, कोरोनाचा सर्वाधिक फटका गरीब आणि श्रमिकांना बसला आहे. त्यामुळे देशातील पूर्व भारतात यामुळे निर्माण झालेली दु:खद परिस्थिती तुम्ही पाहू शकता. त्यामुळे या भागात विकासकांची मोठ्या प्रमाणात गरज आहे. त्यासाठी काम सरु झाले आहे. काही ठिकाणी श्रमिकांच्या स्कील मॅपिंगचे काम सुरु आहे. तर काही ठिकाणी स्टार्टअप कामात गुंतले आहेत. तर काही ठिकाणी मायग्रेशन कमीशन बनवण्यासाठी चर्चा सुरु आहे. त्यामुळे आत्मनिर्भर भारत अभियान या दशकामध्ये देशाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल असा मला विश्वास असल्याचे मत त्यांनी यावेळी मांडले.

सामुहिक शक्तीमुळे कोरोना नियंत्रणात
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थिवर बोलताना म्हणाले की, देशातील सामुहिक शक्तीमुळे देशात कोरोनालाा नियंत्रणात ठेवण्यात यश मिळाले आहे. आपल्या देशाची लोकसंख्या इतर देशांच्या तुलनेत जास्त आहे. मात्र, आपल्याकडे कोरोना पसरलेला नाही. तसेच मृत्यूदर देखील मर्यादित राहिला आहे. नुकसान झालं त्यांच दु:ख आहेच. मात्र जे वाचवू शकले, त्याबद्दल जनतेचे आभार कारण हा लढा जननेतृत्वात सुरु आहे. कोरोना विरोधातील लढाईत देशवासीयांच्या संकल्प शक्तीसोबतच सेवाशक्ती उपयुक्त ठरली आहे.