भाजपपाठोपाठ मनसेनेही केले सचिन वाझेंना ‘टार्गेट’, म्हणाले – ‘सर्व महत्त्वाच्या केसेस त्यांच्याकडेच कशा ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपने मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करून वाझेंचे शिवसेना कनेक्शन उपस्थित करत काही महत्त्वाचे प्रश्न विचारले आहेत. सचिन वाझे यांनी 2008 साली शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले आहे. सगळ्या महत्त्वाच्या केसेस या त्यांच्याकडेच का सोपवल्या जातात? तसेच शिवसेनेचे मुख्यमंत्री झाल्यावर वाझे पुन्हा शासकीय सेवेत कसे रुजू होतात?, असे प्रश्न देशपांडे यांनी उपस्थित केले आहेत. यामुळे वाझेसोबतच शिवसेनेच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझेंवर काही आरोप केले आहेत. सचिन वाझेंचे घर ठाण्यात आहे. जी गाडी चोरी झाली, तीसुद्धा ठाण्यातच सापडली. इतकेच नव्हे, जी गाडी चोरी होऊन ज्या मार्गाने आली आणि तिथे पार्क झाली, तिच्यासोबत सफेद इनोव्हा ठाण्यातूनच आली. एक गाडी पार्क झाली आणि एक निघून गेली. त्याच वाझे यांना या प्रकरणात तपास अधिकारी म्हणून नेमले आहे, हे आश्चर्यकारक असल्याचे फडणवीस म्हणाले. हिरेन बेपत्ता झाल्यानंतर स्थानिक पोलीस आणि इतर कुणीही क्रॉफर्ड मार्केटला पोहोचले नाहीत. वाझे सगळ्यात अगोदर त्या ठिकाणी पोहाेचले. त्यांनाच तिथे चिठ्ठी सापडली. त्यांनाच चौकशी अधिकारी नेमले आहे. आश्चर्य म्हणजे जून-जुलै 2020 मध्येच वाझेंचं या गाडी मालकाशी संभाषण झाले होते, असा आरोपही फडणवीस यांनी केला आहे.